सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी हे कधी कोणते निर्णय घेतील किंवा अस्तिवात असलेले निर्णय बदलतील हे काही सांगता येत नाही. प्रत्येक सिनेमानंतर त्यांचे निर्णयही बदलत असतात. जिथे एकीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगवर तयार करण्यात येणाऱ्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमाच्या निर्मात्यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. पण दुसरीकडे इंदिरा गांधी यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीवर मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘इंदु सरकार’ या सिनेमाला दिलासा मिळाला आहे.

‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’चे नवे पोस्टर प्रदर्शित

सीबीएफसीचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच पाहिला. हा ट्रेलर पाहून ते फार प्रभावित झाले आणि ‘इंदु सरकार’च्या टीमला काँग्रेस किंवा गांधी परिवाराशी निगडीत कोणत्याही व्यक्तीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही असे सांगितले.
निहलानी यांनी सांगितले की, ‘मी मधुरच्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला आणि मी त्यांना भारतीय राजकारणातील एका दुःखद अध्यायावर भाष्य केल्याबद्दल धन्यवाद देतो. ही एक अशी वेळ होती जेव्हा देशाला संपूर्ण जगासमोर एका लज्जास्पद परिस्थीतीचा सामना करावा लागला होता. आणीबाणीच्यावेळी अनेक नेत्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.’

कोणत्याही व्यक्तिरेखेसंदर्भात जर सिनेमा तयार करणार असतील तर त्यासंदर्भात त्या व्यक्तींकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याच्या नियमाची आठवण पहलाज यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमावेळी करून दिली. पण ‘इंदु सरकार’ सिनेमावेळी मात्र त्यांनी स्वतःच बनवलेले नियम मोडीत काढले.

याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘इंदु सरकार’ सिनेमात कोणत्याही व्यक्तिचे नाव घेतले गेले नाही. ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी किंवा संजय गांधी यांच्या नावाचा उल्लेख नाहीये. दिसण्यात साम्य असल्यामुळे तुम्ही असं बोलताय,’ असे पहलाज यांनी पत्रकारांना उत्तर दिले. ‘ट्रेलरमध्ये मी कोणाचेही नाव ऐकले नाही. पण जर त्यांनी सिनेमात असा कोणता उल्लेख केला असेल तर मग या प्रकरणात पुढे काय करायचं ते बघता येईल. पण सध्या मी या गोष्टीवरून आनंदी आहे की, कोणीतरी आणीबाणीवर सिनेमा बनवला. हा भारतीय राजकारणातला एक काळा डाग आहे.’

‘मुन्ना माइकल’चे डिंग डँग’ गाणे पाहिले का?

मधुर भांडारकर दिग्दर्शित आगामी ‘इंदु सरकार’ सिनेमात नील नितिन मुकेश संजय गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय गांधी यांच्या भूमिकेविषयी रंगलेल्या चर्चेवर दिग्दर्शक मौन बाळगून होते. या सिनेमात सुप्रिया विनोद इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या दोन कलाकारांशिवाय सिनेमात किर्ती कुल्हारी आणि ‘अहिल्या’ फेम टोटा रॉय चौधरी हेदेखील दिसणार आहेत.