मुंबईच्या प्रतिष्ठित ‘जेजे कला महाविद्यालया’चे पहिले भारतीय अधिष्ठाता रावबहादूर महादेव विश्वनाथ (एम.व्ही.) धुरंधर यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या चित्रांतून त्यांची थोरवी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनात येत्या मंगळवार, ११ सप्टेंबरपासून मिळणार आहे. महाराष्ट्राभिमानी माणसाने चुकवू नये असे हे पाच मजली प्रदर्शन, केवळ धुरंधरांचीच नव्हे तर गेल्या शतकातल्या महाराष्ट्रीय चित्रकलेची ओळख करून देणारे आहे.

रावबहादूर धुरंधर १८ मार्च  १८६७ रोजी जन्मले आणि १ जून १९४४ रोजी निवर्तले. त्यांचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष खरे तर उलटून गेले आहे. पण केंद्र सरकारच्या मोठय़ा कलादालनात त्यांचा इतिहास मांडणारे प्रदर्शन साकारणे, हे सोपे काम नव्हते. दिल्ली, सांगली, कोल्हापूर, मुंबई, सातारा, औंध, नागपूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणच्या संग्रहालयांत तसेच देश-विदेशातील संग्राहकांकडे असलेली धुरंधरांची चित्रे (वा त्यांच्या प्रति) या निमित्ताने मुंबईत एका छताखाली पाहता येणार आहेत. ब्रिटिश आमदनीत धुरंधर वाढले, मानवाकृती चित्रांवर त्यांनी भर दिला, पण या मानवाकृतींच्या एकत्रित रचना -फिगर कॉम्पोझिशन- करताना त्यांनी जणू प्राचीन लेण्यांमधून दिसणाऱ्या भारतीय समूहशिल्पांच्या परंपरेला आधुनिक रूप दिले. धुरंधरांच्या आधी राजा रविवर्मा यांनी भारतीय रचनाचित्रांची सुरुवात केली होती आणि धुरंधरांच्या काळात एम. एफ. पीठावाला आणि ए. एक्स. त्रिन्दाद यांसारखे अव्वल व्यक्तिचित्रणकार होते; तसेच आबालाल रहिमानांसारखे पेन्सिल/ चारकोल/ जलरंग अशा कोणत्याही माध्यमातून तरल अभिव्यक्ती करणारे प्रतिभावंतही होते. या तिन्ही विविध वाटांचा मिलाफ धुरंधरांच्या चित्रकलेत दिसून येतो.

‘एनजीएमए’ (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या कावसजी जहांगीर हॉलमधील (रीगल सिनेमाच्या चौकात, छ. शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या समोर) या प्रदर्शनाची कल्पना ‘एनजीएमए’च्या मुंबई सल्लागार समितीचे प्रमुख आणि महाराष्ट्रीय कलेचे अभ्यासक व चित्रकार सुहास बहुळकर यांनी मांडली. या केंद्र सरकारी संस्थेच्या दिल्ली व मुंबईतील संचालकांनी संकल्पनेस पाठिंबा दिला आणि धुरंधरांची अनेक चित्रे ज्या ‘दिल्ली आर्ट गॅलरी’कडे आहेत, तिचे संस्थापक आशीष आनंद यांनीही सहभागाची तयारी दाखवली. त्यामुळे केवळ प्रदर्शनच नव्हे, तर एक देखणे, मोठय़ा आकारातील ३१४ पानांचे पुस्तकही या प्रदर्शनासोबत सिद्ध होऊ शकले. ‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ हे या पुस्तकाचे नाव. सुहास बहुळकरांनीच त्याचे लेखन केले आहे. रेखाटने, रंगचित्रे, चित्र-पोस्ट कार्डे, पुस्तकांची मुखपृष्ठे आणि बोधचित्रे (इलस्ट्रेशन्स) जाहिरातींसाठी केलेली प्रचारचित्रे (पोस्टर्स),  व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे याखेरीज शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग, औंधच्या राजांचे दसरा सोहळ्यातील चित्र, ब्रिटनच्या राजाचे भारतातील आगमन आदी रचनाचित्रे, आई-मूल तसेच निरनिराळ्या संस्कृतींतील स्त्रियांची चित्रे आणि धुरंधरांच्या दोन्ही पत्नींची चित्रे असा या प्रदर्शनाचा पसारा आहे. यातील बहुतेक चित्रे ‘रोमँटिक रिअ‍ॅलिस्ट’ या पुस्तकातही आहेत.

पुस्तक मराठीतही?

मुंबईतील मोठय़ा प्रदर्शनाच्या निमित्ताने धुरंधर यांच्याविषयी प्रकाशित होणारे पुस्तक फक्त इंग्रजीतच आहे. पण त्याचे लेखक सुहास बहुळकर हे मराठीत महत्त्वपूर्ण लेखन करणारे अभ्यासू चित्रकार. ‘धुरंधरांवर मी मुळात भरपूर लिहिलं मराठीत.. त्याचा काही भागच इंग्रजीत येऊ शकला आहे’ असे त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितले.  ‘पुस्तक मराठीत येणार नाही का?’ या प्रश्नावर, ‘‘मजकूर तयारच आहे, चित्रंही उपलब्ध आहेत.. पण प्रकाशक तयार झाले पाहिजेत..’’ असे बहुळकर म्हणाले. एवढय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी मराठीत कोण प्रकाशक तयार होणार, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. याविषयी प्रदर्शनाशी संबंधित काही माहीतगारांचे म्हणणे असे की, महाराष्ट्र राज्याच्या ‘साहित्य संस्कृती मंडळा’ने तरी मराठी पुस्तकाचे काम हाती घ्यावे. बहुळकरांनी ‘बॉम्बे स्कूल : आठवणीतले, अनुभवलेले’ हे मराठी पुस्तक लिहिले होते, पण (केंद्रीय) ललित कला अकादमीने केवळ धुरंधरांचेच नव्हे तर बॉम्बे स्कूल कलापरंपरेतील अनेक महत्त्वाच्या चित्र-शिल्पकारांविषयीची सचित्र पुस्तके केली पाहिजेत, असे मतही या जाणकारांनी व्यक्त केले.

‘‘किमान एक उत्तम उपयोजित कलावंत- कमर्शिअल आर्टिस्ट- या दृष्टीने तरी धुरंधरांकडे पाहा. धुरंधरांकडे दुर्लक्ष बरेच झाले आहे. १९३६ मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये खांदेपालट झाला. त्यांनी त्यापूर्वीच्या काळातील चित्रकार धुरंधर यांना चित्रकार म्हणून स्वीकारले नाही, पण आजचे निकष त्या काळातील कलाकारांवर लावून त्यांचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. काळाच्या संदर्भात चित्रकारांचे मूल्यमापन व्हावे.’’   – सुहास बहुळकर, प्रदर्शनाचे संयोजक व ज्येष्ठ चित्रकार.

तरुण पिढीला धुरंधरांची चित्रकारी आणि त्यांचे महत्त्व समजावे या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल. –  शिवप्रसाद खेनेड,नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट-मुंबईचे संचालक