X
X

‘पाकिजा’ फेम गीता कपूर यांचे निधन

READ IN APP

वृद्धाश्रमात मुलांच्या प्रतिक्षेत घेतला अखेरचा श्वास

पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे आज सकाळी ९ वाजता मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. निर्माते अशोक पंडित यांनी गीता यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक म्हणाले की, ‘आम्ही आमच्यापरिने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी ९ वाजता गीताजी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत होत्या. पण या वर्षभरात कोणीच त्यांना भेटायला आले नाही. त्यांना बरं वाटावं म्हणून गेल्या शनिवारी आम्ही ग्रॅण्ड ब्रेकफास्टचे नियोजनही केले होते. त्या व्यवस्थित होत्या, पण आतून त्या आनंदी नव्हत्या. गीताजी यांना त्यांच्या मुलांना शेवटचे पाहायचे होते. पण त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. कारण त्यांना भेटायला वर्षभरात कोणीच आले नाही. आज सकाळी ९.०० वाजता वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.’

वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला. त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला. गीता कपूर यांना २१ एप्रिल २०१७ रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगा राजा याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यानंतर तो रुग्णालयातून निघून गेला आणि पुन्हा आलाच नाही.

गीता यांनी त्यावेळी मुलगा राजा त्यांना कशापद्धतीने त्रास द्यायचा हे प्रसारमाध्यमांसमोर दुःख कथन केले. रुग्णालयात नेण्यासाठी राजाने त्यांना पहिले काही दिवस त्रास दिला. गीता वृद्धाश्रमात जाण्यास तयार नव्हत्या, म्हणून राजाने त्यांना ३ ते ४ दिवस काहीही खायला दिले नाही. त्यामुळे गीता यांची तब्येत खालावली आणि त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले आणि मुलांनी त्यांना सोडून दिले असा आरोप गीता यांनी केला होता.
राजा त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता.

आपण वृद्धाश्रमात जाण्यास तयार नसल्याने त्याने आपल्याला ३ ते ४ दिवस काहीही खायला न देता दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला. आणि अशापद्धतीने इथे सोडून दिले असा आरोप त्यांनी केला आहे. एकीकडे गीता यांचे कुटुंब त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असताना निर्माते रमेश तौरानी यांनी पुढे येत रुग्णालयाचे बील भरले होते.

20
X