पाकिस्तानमधील एका व्यक्तिला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी विशेष चप्पल बनवल्याने तुरुंगात टाकण्यात आले आहे. हे शूज हरणाच्या चामड्यापासून बनवण्यात आल्याचे म्हटले जातेय. स्वतः त्या व्यक्तिने आपण शाहरुखसाठी चप्पल बनवल्याची बातमी प्रसार माध्यमांना दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा पेशावर येथे राहणारा नातेवाईक जहांगीर खान हा गेल्या शुक्रवारी चप्पल बनवणा-याकडे गेला होता. त्याने शाहरुखसाठी दोन जोडी पेशावरी चप्पल बनवण्यास सांगितले होते.
स्थानिक पोलीस अधिकारी म्हणाले की, जहांगीर खान हा शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्याने बॉलीवूड अभिनेत्याला विशेष भेट देण्याचे ठरवले. त्यासाठी जहांगीरने त्याच्यातर्फे हरणाच्या चामड्यापासून चप्पल बनवून घेतले. ही बातमी सगळीकडे पसरताच वनविभागाच्या अधिका-यांनी आम्हाला संपर्क केला आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर आम्ही जहांगीरला अटक केली असून तो आता तुरुंगात आहे. पेशावर येथील वनविभाग अधिकारी म्हणाले की, जहांगीर हरणाच्या चामडीपासून चप्पल बनवत होता की नाही याचा तपास चालू आहे. जर त्याने चप्पल बनवण्यासाठी हरणाच्या चामड्याचा वापर केला असेल तर त्याच्यावर दंड आकारला जाईल. तसेच त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात येईल. शाहरुखकरिता चप्पल बनवण्यासाठी ज्या व्यक्तीकडे देण्यात आल्या होत्या त्याने याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासाठी सिंहाच्या चामड्यापासून चप्पल तयार केल्याचे कळते. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याची पाकिस्तानमध्ये बरीच मोठी फॅनफॉलोइंग आहे. दरम्यान यावर्षी शाहरुखचा रईस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचसोबत तो झोया अख्तर दिग्दर्शित डिअर जिंदगी चित्रपटात आलिया भट हिच्यासोबत झळकेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 10:19 am