बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांना होणारा विरोध सर्वांनाच माहित आहे. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’मध्ये फवाद खान आणि शाहरुखच्या ‘रईस’ चित्रपटात माहिरा खानची भूमिका असल्याने या दोन्ही चित्रपटांना सुरुवातीला विरोध सहन करावा लागला होता. शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाची स्तुती करणारी पाकिस्तान अभिनेत्री सबा कमर आणि अभिनेता इम्रान अब्बास सध्या ऑनलाइन ट्रोलचे शिकार झाले आहेत.

सबा कमर ‘हिंदी मिडियम’ चित्रपटात इरफान खानसोबत भूमिका साकारलेली तर इम्रान अब्बासने ‘क्रिएचर 3D’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ पाहिल्यानंतर सबाने सोशल मीडियावर या चित्रपटाविषयीचं तिचं मत मांडलं. इम्राननंही या पोस्टला लाइक करत त्यावर स्तुती करणारी कमेंटही केली. मात्र यामुळे त्यांना ऑनलाइन ट्रोल केलं जाईल याचाही विचारही कोणी केला नसेल.

जाणून घ्या, झहीर-सागरिकाचा ‘वेडिंग प्लान’

‘मी ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट पाहिला आणि मी त्याच्या प्रेमातच पडले. समिक्षकांनी काय म्हटलं त्याने मला फरक पडत नाही. चित्रपटांतील भूमिका, त्यांच्या भावना मला खूप आवडल्या. शाहरुख आणि अनुष्काची केमिस्ट्रीसुद्धा जबरदस्त होती. मी तो चित्रपट फक्त पाहिलाच नाही तर त्याला मी जगलेसुद्धा. इम्तियाज अली यांचं दिग्दर्शन प्रशंसनीय आहे. तुमच्या संकल्पना, दिग्दर्शन मला खूप आवडतं. मी हा चित्रपट अनेकदा पाहू शकते. अजूनही मी तुमची पुरेशी स्तुती केल्याचं समाधान मला मिळत नाहीये. मला फक्त हेच म्हणायचे आहे की, तुस्सी लाजवाब हो,’ या शब्दांत सबा कमरने सोशल मीडियावर शाहरुख, अनुष्का आणि इम्तियाज अलीची प्रशंसा केली. या पोस्टच्या कमेंटमध्ये इम्रान अब्बास म्हणाला की, ‘खरंय तुझं. मलाही हा चित्रपट आवडला. इम्तियाज अली यांचे चित्रपट म्हणजे एखादी कलाकृतीच असल्याचा भास होतो. प्रत्येकालाच कला समजते असं नाही तरी त्याची जाण असणारेच खरा आस्वाद घेऊ शकतात.’ इम्रानच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर टीकाटिप्पणी सुरु झाली. एखाद्या चित्रपटाबाबत प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. मात्र सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींना अनेकदा त्यांच्या मताबद्दल ट्रोल केलं जातं.