अभिनेत्री आलिया भट्टचा ‘पराडा’ हा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या म्युझिक व्हिडीओवर पाकिस्तानी अभिनेत्रीने आक्षेप घेतला आहे. आलियाने हे गाणं चोरल्याचा आरोप पाकिस्तानी अभिनेत्री मेहविश हयातने केला आहे.

मेहविशच्या ‘वाइटल साइन’ या अल्बममधील ‘गोरे रंग का जमाना’ हे गाणं आणि आलियाच्या ‘प्राडा’ या गाण्यात साम्य असल्याचं तिने ट्विटरवर म्हटलं आहे. ”एकीकडे बॉलिवूड कलाकार पाकिस्तानला संधी मिळेल तेव्हा ऐकवत असतात. तर दुसरीकडे ते आमचंच गाणं चोरत आहेत. हे खूप विचित्र आहे,” असं मेहविशने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मेहविशच्या या आरोपांवर आलियाचं काय म्हणणं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आलिया अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहेच, पण तिची गाणीही लोकांनी तितकीच डोक्यावर घेतली आहेत. तिने यापूर्वी हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तिनं गायलेल्या गाण्यांना काही पुरस्कारही मिळालेत. ‘हायवे’, ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘उडता पंजाब’ अशा चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. ‘लँबर्गिनी’ हा हिट अल्बम देणाऱ्या संगीतकारासोबत आलियाने ‘प्राडा’ हा खास म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. हे गाणं आलियाने स्वत: गायलं असून तिचं हे पहिलं नॉन-फिल्मी गाणं आहे.