पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर त्याचा निषेध म्हणून ‘झी जिंदगी’ वाहिनीवरील पाकिस्तानी कलाकारांच्या मालिका बंद करण्याचा निर्णय झी समूहाने घेतला होता. भारतावर सतत होणा-या पाकिस्तानी हल्ल्यांना हे सडेतोड आणि योग्य उत्तर आहे. भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांना कलेच्या माध्यमातून आणखी जवळ आणण्यासाठी ‘जोडे दिलो को’ या टॅगलाइन अंतर्गत २०१४ साली ‘झी जिंदगी’ वाहिनी सुरु करण्यात आली होती. या मालिकांनंतर फवाद खान आणि माहिरा यांसारख्या कलाकारांना बॉलीवूडमध्ये स्थान मिळाले. भारतात इतकी प्रसिद्धी आणि प्रेम मिळूनही या कलाकारांनी मात्र उरी हल्ल्याचा निषेध करणंही गरजेच समजलेल नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, झी समूहाचे अध्यक्ष चंद्रा यांनी पाकिस्तानी कलाकारांना उरी हल्ल्याविषयी निषेध व्यक्त करण्याची विनंती केली होती. मात्र, या कलाकारांनी त्यास नकार दिला. एका पत्रकार परिषदेत चंद्रा म्हणाले की, पाकिस्तानी कार्यक्रमांना मागे घेण्याचा निर्णय हा दुर्दैवी होता. पण, प्रेम हे दोन्ही बाजूने असणे गरजेचे असते ते एकाच बाजूने नसावे. ‘जिंदगी’ वाहिनीद्वारे पाकिस्तानी कलाकारांना भारतीय मनोरंजनसृष्टीत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मात्र, ती लोक सतत चुकीच्या गोष्टीच करत असून पठाणकोट आणि आता उरी यांसारखे हल्ले घडवून आणत आहेत. जर तुम्हाला लढायच असेल तर समोरून लढा. असे भ्याड हल्ले का करता? त्यामुळे आम्ही पाकिस्तानी मालिका न दाखवण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक दृष्ट्या पाहता हा निर्णय चुकीचा आहे. ‘झी जिंदगी’वर जवळपास ६० कोटी खर्च व्हायचा. पण पैसा महत्त्वाचा नाही. आपल्या देशाचा स्वाभिमान आणि येथील लोकांच्या भावना जास्त महत्त्वाच्या असल्याचे चंद्रा म्हणाले.
इतकेच नाही तर चंद्रा यांनी फवाद खान, महिरा, अली झफर, शफकत अमानत अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ असलम, वीणा मलिक, इमरान अब्बास आणि अन्य काही पाकिस्तानी कलाकारांना रात्रीच्या वेळी झोपलेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्याची विनंती केली. पण या सर्व कलाकरांनी त्यास नकार दिल्याचे चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.