आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदारो’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानातील एका मंत्र्याने या चित्रपटाला भ्रामक म्हटले आहे. चित्रपटात दाखवलेली सिंधु संस्कृती आणि एकंदर चित्रपटाबाबत पाकिस्तानातील मंत्री सरदार अली शाह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मूळ घटनेमध्ये बदल करत ही कथा पडद्यावर मांडण्यात आली आहे असा दावा सरदार अली शाह यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी माफी मागावी अशी मागणी या मंत्रीमहोदयांनी केली आहे.
‘मोहेंजोदारो’ या ठिकाणाचे जागतिक महत्त्व पाहता चित्रपटात दाखवलेले ‘मोहेंजोदारो’चे रुप वास्तवापेक्षा वेगळे असल्यामुळे पाकिस्तानी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘मोहेंजोदारो’ चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये शेकडो वर्षांपूर्वीच्या जीवनशैलीचे आणि नगररचनेचे अत्यंत प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. ‘मोहेंजोदारो’च्या निमित्ताने हृतिक रोशन आणि पूजा हेगडेच्या रुपात एक नवी जोडी सिनेरसिकांसमोर आली. आतापर्यंत मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूजा हेगडेचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे ती अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत असून, ती चानीच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या व्यतिरिक्त कबीर बेदी, अरुणोदय सिंग, सुहासिनी मुळ्ये, मनिष चौधरी हे कलाकारही आहेत.