पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) ९९ प्रवासी आणि आठ कर्मचारी असलेले विमान शुक्रवारी कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दाट लोकवस्ती असलेल्या निवासी परिसरात कोसळून ६० जण ठार झाले आहेत. या विमान अपघातात पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिने जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे.

झारा लाहोरमध्ये कपड्याच्या एका ब्रँडसाठी फॅशन शो करत होती. मात्र तेव्हाच तिच्या काकांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे लाहोरहून ती कराचीसाठी निघाली होती. दुर्दैवाने विमान अपघातात झाराचा मृत्यू झाला. या विमान अपघातात काही जण वाचल्याचंही म्हटलं जातं होतं. मात्र पत्रकार झैन खान यांनी ट्विट करत झाराच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं सांगितलं. झाराच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.instagram.com/p/B_4rLQalEkC/

लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले. यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.