जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जाचा आधार असलेला ‘कलम ३७०’ रद्द करण्याचे ऐतिहासिक पाऊल मोदी सरकारने उचलले. त्याचबरोबर राज्याचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानी ट्रोलर्सनी सोशल मीडियाद्वारे भारतीय कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर गायक-संगीतकार अदनान सामी याला पाकिस्तानी ट्विटर युजर्सने काही खोचक प्रश्न विचारले होते. त्यावर अदनान सामीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानी ट्रोलर्सने अदनान सामीवर निशाणा साधला आहे.

एका पाकिस्तानी यूजर्सने अदनान सामीला जम्मू आणि काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्यावर खोचक प्रश्न विचारला आहे. ‘अदनान तुझ्यात हिंमत असेल तर कश्मीरच्या प्रश्नावर ट्विट करुन दाखव. मग पाहूया तुझा भारत तुझी काय आवस्था करतो’ असे ट्विट पाकिस्तानी यूर्जसने केले आहे. त्यावर अदनान सामीने लगेच प्रत्युत्तर दिले आहे. ‘का नाही. काश्मीर हा भारतचा अविभाज्य घटक आहे. ज्या गोष्टींचा तुमच्याशी संबंध नाही त्या गोष्टींमध्ये नाक खूपसू नका’ असे सडेतोड उत्तर अदनान सामीने दिले आहे. अदनानच्या या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत.

याआधी ही अदनान सामीला ट्रोल करण्यात आले होते. भारताचा स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्टला असतो तर पाकिस्तानचा १४ ऑगस्टला. त्यामुळे १४ ऑगस्टला ट्विटरवर पाकिस्तानी नागरिक त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत होते. त्यातच एका असीम अली रझा नावाच्या पाकिस्तानी युजरने पूर्वाश्रमीचा पाकिस्तानी नागरिक असलेला मात्र आता भारतीय झालेल्या अदनान सामीला एक खोचक सवाल केला. तू स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छांचे ट्विट का करत नाहीस? असे या युजरने म्हटले. म्हणजेच पाकिस्तानच्या स्वांतंत्र्यदिनानिमित्त तू शुभेच्छा का देत नाहीस असे या युजरला सुचवायचे होते. मात्र, त्याच्या या खोचक सवालावर अदनानने तितकेच तडफदार आणि सुंदर उत्तर दिले. अदनान म्हणाला, मी १५ ऑगस्टरोजी स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छांचे ट्विट करणार आहे.