मासिक पाळी आणि त्याविषयीच्या काही मुद्द्यांवर सहसा मोकळेपणाने चर्चा केली जात नाही. मुळात याविषयी आजही अनेकांच्या मनात न्यूनगंड असून, काही गैरसमजुतीही प्रचलित आहेत. अशा या संवेदनशील मुद्द्यावर आर. बाल्की, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी पुढाकार घेत एक चित्रपट साकारला. ‘पॅडमॅन’ चित्रपटातून अक्षय कुमार एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मुळात समीक्षकांनी त्याच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरीही चाहत्यांनी मात्र अक्षयच्या बाजूने कौल दिला आहे. एका अशा मुद्द्यावर चित्रपट साकारणं ही धाडसी बाब असून, त्याच्या या वृत्तीचं कौतुक करावं तिततं कमीच, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. एक सकारात्मक दृष्टीकोन मांडणाऱ्या या चित्रपटाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही पाकिस्तानमध्ये मात्र त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली.

सोशल मीडियापासून ते अगदी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये चर्चेत असणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रदर्शन करणे हे धर्माच्या विरोधात जाण्यासारखे होईल असे म्हणत पाकिस्तानमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. पण, आता शेजारी राष्ट्रातील काही चाहत्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत ‘पॅडमॅन’ प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

‘हो, आम्हा पाकिस्तानी महिलांनासुद्धा मासिक पाळी येते’, असे उपरोधिक ट्विट करत अमारा अहमद या ट्विटर युजरने हातात सॅनिटरी पॅड पकडून ‘पॅडमॅन’च्या प्रदर्शनाची मागणी केली. ‘मासिक पाळीच्या विषयाला अनुसरुन उचलण्यात आलेल्या या महत्त्वाच्या उपक्रमात मी खिलाडी कुमारसोबत आहे’, असं तिने ट्विटमध्ये स्पष्ट केलं. त्यासोबतच देशात या चित्रपटाला करण्यात येणारा विरोध निरर्थक असल्याचं ठाम मतही तिने मांडलं. तर, ‘सेन्सॉर बोर्डाच्या निर्णायक मंडळात कोण बावळट लोक बसले आहेत’, असं म्हणत आणखी एका युजरने पाकिस्तानच्या सेन्सॉरवर ताशेरे ओढले.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

‘मासिक पाळी हा मानवी आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असून, त्याविषयी मोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोलणं आणि हा मुद्दा प्रकाशझोतात आणणं, हे तत्वं आणि धर्माच्या विरोधात जाणारं मुळीच नाही’, असं म्हणत पाकिस्तानमधील चाहते ‘पॅडमॅन’च्या प्रदर्शनासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट होत आहे. चाहत्यांचे ट्विट आणि सोशल मीडियावर चर्चेत आलेला ‘पॅडमॅन’चा मुद्दा या सर्व गोष्टी लक्षात घेत ‘गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान’ या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलं. सध्यातरी या चित्रपटाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यात आला नसल्याचं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तेव्हा आता ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉर’ पुढे या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाल्यानंतरच त्यासंबंधीचा निर्णय देण्यात येणार असल्याचं कळतं.