News Flash

पल्लवी जोशी मालिकेत..!

काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहतात.

पल्लवी जोशी मालिकेत..!
पल्लवी जोशी

काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून राहतात. त्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख वारंवार होत असतो. अशा कलाकारांपैकीच एक नाव म्हणजे पल्लवी जोशी. पल्लवी जोशी आता एका मराठी मालिकेत दिसणार आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर ज्या ‘ग्रहण’ मालिकेची जाहिरात केली जाते आहे त्या मालिकेत पल्लवी प्रमुख भूमिकेत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.गेल्या आठवडय़ात खग्रास चंद्रग्रहण झालं. या ग्रहणाविषयी लोकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्याच दिवशी रात्री झी मराठीवर या मालिकेची पहिली झलक दाखवण्यात आली. या पहिल्यावहिल्या टीझरमध्ये कोणतेही कलाकार नव्हते पण ‘ग्रहण’ असा शब्द स्क्रीनवर दिसला आणि त्यामागे ‘आज खग्रास चंद्रग्रहण.. अजून एक ग्रहण सुरू होतंय झी मराठीवर.. लवकरच’ या आशयाचं वाक्यही ऐकवलं गेलं. यामुळे त्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. ‘ग्रहण’ हे नेमकं काय असेल याबाबत चर्चाही सुरू झाली. ‘ग्रहण’ ही मालिका मार्च महिन्यात झी मराठीवर सुरू होणार असल्याची माहिती मिळते. या मालिकेविषयी अतिशय गुप्तता पाळली जात असून याचे चित्रीकरणही सुरू झाले आहे. या मालिकेत काही नवे चेहरेही बघायला मिळणार आहेत.पल्लवी जोशी हे कलाविश्वातलं मोठं नाव. अनेक उत्तम मालिका, सिनेमे त्यांच्या नावे आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांची ओळख आहेच; पण कालांतराने त्या मराठी मालिकेच्या निर्मितीतही उतरल्या होत्या. ‘असंभव’ या गाजलेल्या मालिकेची निर्मिती त्यांनी केली होती. त्यानंतर मराठी सारेगमपच्या अनेक पर्वामध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करताना त्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. मराठी सारेगमपच्या अलीकडे झालेल्या पर्वाच्या वेळी पल्लवी जोशी यांच्या सूत्रसंचालनाची आठवण बऱ्याचदा प्रेक्षक काढत होते. मधल्या काळात त्या ‘बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम’ या वेगळ्या धाटणीच्या विषयाच्या हिंदी सिनेमात अभिनेत्री म्हणून दिसल्या होत्या. तर ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या मराठी सिनेमातही त्यांनी अभिनेत्री म्हणून उत्तम काम केलं होतं. आता त्या मराठी मालिकेत अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतं. ‘ग्रहण’ या शीर्षकावरूनच मालिकेबद्दल कुतूहल निर्माण झालं आहे. त्यातच पल्लवी जोशी यांच्यासारखी अनुभवी आणि उत्तम अभिनेत्री असेल तर त्याबद्दलची उत्सुकता आणखीच वाढणार यात शंका नाही. या मालिकेच्या संदर्भात पल्लवी जोशी यांना संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2018 2:15 am

Web Title: pallavi joshi to make a comeback on tv
Next Stories
1 मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारा ‘आपला मानूस’
2 अशीही.. ‘श्यामची आई’!
3 एकता कपूरचा भलता नियम..
Just Now!
X