करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटात अभिनेत्री पल्लवी शारदाने काम केले होते. नावावरून दाक्षिणात्य असली तरी तिचा प्रवास दाक्षिणात्य चित्रपटांतून झालेला नाही. अभिनय क्षेत्रात नाव कमावण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाहून मुंबई गाठलेल्या पल्लवी शारदाने रणबीर कपूरबरोबर ‘बेशरम’ आणि आयुषमान खुराणाबरोबर ‘हवाईजादा’ असे दोन मोठे चित्रपट केले. मात्र बाहेरून येणाऱ्यांसाठी बॉलीवूडची वाट बिकट असतेच, हा अनुभव घेणारी पल्लवी सध्या ‘आयपीएल’ सामन्यांची ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ खेळायला सिद्ध झाली आहे.

नेहमीप्रमाणे हा क्रिकेटचा मोसम असल्याने आयपीएल सामन्यांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’ने आपल्या लोकप्रिय ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ या शोसाठी सूत्रसंचालनाची जबाबदारी पहिल्यांदाच पल्लवी शारदावर सोपवली आहे. बॉलीवूड किंबहुना आंतरराष्ट्रीय अभिनेत्री ते छोटय़ा पडद्यावरचे सूत्रसंचालन या प्रवासाबद्दल विचारले असता क्रिकेटची चाहती असल्याने ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’ हा या प्रवासातील एक वेगळा आणि गमतीशीर टप्पा असल्याचे पल्लवीने सांगितले. कलाकार म्हणून पहिल्यापासूनच आपल्यासाठी कोणतीही भाषेची किंवा देशाची बंधने नव्हती, असे पल्लवीने स्पष्ट केले. तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने तिथेच आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २०१० मध्ये तिने करण जोहर दिग्दर्शित ‘माय नेम इज खान’मध्ये छोटी भूमिका केली होती. त्यानंतर ‘दस तोला’ आणि ‘लव्ह ब्रेकअप्स जिंदगी’ असे दोन हिंदी चित्रपट केल्यानंतर तिने पहिल्यांदा अभिनव कश्यप दिग्दर्शित ‘बेशरम’ चित्रपटात रणबीरच्या नायिकेची भूमिका केली. ‘‘बॉलीवूड हे बाहेरच्यांसाठी नेहमीच अवघड राहिले आहे. कोणतेही मार्गदर्शन नसताना इथे काम करताना संघर्ष हा अटळ आहे,’’ असे पल्लवीने सांगितले. मात्र, सुदैवाने बॉलीवूडबरोबरच तिने आंतरराष्ट्रीय चित्रपटातही काम केले असल्याने तिचे लक्ष प्रामुख्याने तिथल्या चित्रपटांवर असल्याचे तिने सांगितले. आत्ताही ती लागोपाठ तीन आंतरराष्ट्रीय चित्रपटांत काम करते आहे.

‘लायन’ या चित्रपटात ती देव पटेल आणि हॉलीवूड अभिनेत्री निकोल किडमनबरोबर काम करते आहे. याशिवाय, ‘शम्बाला’ आणि आणखी एक आंतरराष्ट्रीय चित्रपट पल्लवी करते आहे. ऑस्ट्रेलियातच लहानाची मोठी झाल्याने तिथल्या वातावरणातील मोकळेपणा अर्थातच तिथल्या कामामध्येही असतो. मात्र तसा अनुभव हिंदी चित्रपटात काम करताना मिळत नाही. आपल्याकडे समाजात आणि इंडस्ट्रीतील कामातही एक प्रकारची क्रमवारी आहे. त्याचा फटका प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कलाकाराला बसतो. मात्र अशा प्रकारची क्रमवारी किंवा दुजाभाव हॉलीवूडपटांमध्ये काम करताना नसतो. तुम्ही एक कलाकार म्हणून तुमचे काम चोखपणे बजावता आणि त्यासाठी तुमचा योग्य तो आदरही केला जातो, हा फरक जाणवण्याइतपत असल्याचे पल्लवीने सांगितले. तरीही हिंदी चित्रपटांबद्दल ती आशादायी असल्याचे तिने सांगितले. सध्या बॉलीवूडमध्ये ज्या पद्धतीने नायिकाप्रधान चित्रपटांची निर्मिती होते आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आशयाच्या दृष्टीनेही हिंदी चित्रपटांमध्ये खूप लक्षणीय बदल होत असल्यामुळे हे कलाकारांच्या दृष्टीने स्वागतार्ह असल्याचे तिने सांगितले.

हिंदीतही आपण बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्यावर भर दिला असल्याचे पल्लवीचे म्हणणे आहे. ‘बेशरम’ आणि ‘हवाईजादा’ या दोन्ही चित्रपटांतील भूमिका वेगळ्या होत्या. रणबीरबरोबर काम करताना त्याने कधीही तो मोठा स्टार असल्याचे जाणवून दिले नाही. मात्र माझी खरी गट्टी जमली ती आयुषमानबरोबर.. माझा जन्म परदेशातील असला तरी माझे आईवडील मूळचे दिल्लीचे आहेत. आयुषमानही चंदिगढचा असल्याने अनेक गोष्टींबाबत आम्ही सारखे होतो, असे तिने सांगितले. आयुषमाननेही टीव्हीवरचा सूत्रसंचालक ते अभिनेता असा संघर्ष करतच यश मिळवले आहे. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये तोही एक समान धागा होता, असे तिने सांगितले. बॉलीवूडमध्ये अजूनही काम करायचे असले तरी आपले ध्येय हे प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम करण्याचेच असल्याचे तिने स्पष्ट केले. सध्या तरी ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’वर तिने लक्ष केंद्रित केले आहे. चित्रपटातून काम करण्याचा अनुभव असला तरी तिथे रिटेकची संधी मिळते, सूत्रसंचालन करताना तुमचा कस लागतो, लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना तुम्हाला परिस्थिती हाताळणे खूप महत्वाचे असते. हाही एक अनुभव जोडून पाहावा इतक्या सहजतेने ती या ‘एक्स्ट्रा इनिंग्ज’मध्ये सहभागी झाली आहे.