‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे धोंडिबा बाळू कारंडे. या मालिकेमध्ये शितलच्या काकाची अप्पा ही व्यक्तीरेखा धोंडिबा यांनी साकारली होती. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनीही भरभरुन प्रेम केलं. या मालिकेनंतर धोंडिबा यांनी त्यांचा मोर्चा चित्रपटाकडे वळविला असून ते ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या धोंडिबा कारंडे लिखित ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाची कथा ‘भागी’ नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात धोंडिबा कारंडे यांनी क्रीडाशिक्षकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही भूमिकेमध्ये ते वावरणार आहेत.त्यामुळे साऱ्याचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजल्या गेलेल्या ‘पळशीची पीटी’मध्ये ऍथलेट ‘भागी’च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे झळकणार असून तिच्या व्यतिरिक्त राहुल मगदूम, तेजपाल वाघ, शिवानी घाटगे आदी कलाकार झळकणार आहेत. येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.