ऐतिहासिक कथानकांची मोठ्या रंजकतेनं मांडणी करण्यासाठी ओखळला जाणारा चित्रपट दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारिकर. त्यांच्या ‘पानिपत’ या आगामी चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. शूटिंग सुरु झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी नवनवीन गोष्टी उलगडल्या जात आहेत. या चित्रपटाचे कथानक पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमानसुद्धा आता या चित्रपटात दिसणार आहेत असं समजतंय.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, ‘अभिनेत्री झीनत अमान या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. होशियारगंजमधील सकिना बेगम यांची भूमिका त्या निभावणार आहेत.’ आशुतोष गोवारिकर यांनी सांगितले की, “त्यांची व्यक्तिरेखा त्यांच्या राज्यापुरतीच मर्यादित राहणारी आहे. राजकारणापासून ही व्यक्तिरेखा लांब आहे. पुढच्या आठवड्यापासून त्या शूटिंगला सुरुवात करणार असून त्यांचा चित्रपटातील लूक समोर आणण्यासाठी मी फार उत्सुक आहे.”

आशुतोष व झीनत अमान यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गवाही’मध्ये एकत्र काम केले आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. शूटिंगसाठी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत शनिवारवाड्याची प्रतिकृतीदेखील उभारण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.