‘पानिपत’च्या ऐतिहासिक लढाईवर आधारित ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. १७६१ साली अहमद शाह अब्दाली व मराठे यांच्यात झालेल्या युद्धावर चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये अहमद शाह अब्दालीची भूमिका अभिनेता संजय दत्त साकारत आहे. चित्रपटाचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासूनच संजय दत्तच्या भूमिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या भूमिकेसाठी संजय दत्त व्यतिरिक्त इतर कोणता अभिनेता योग्य ठरला नसता असं दिग्दर्शक गोवारीकर सांगतात.

संजय दत्त ते अहमद शाह अब्दाली हा प्रवास कसा घडला याचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटातील इतर कलाकार व दिग्दर्शक गोवारीकर हे संजय दत्तच्या भूमिकेबद्दल बोलताना दिसत आहेत. “चित्रपटाची पटकथा लिहायला घेतल्यापासूनच माझ्या डोक्यात अहमद शाह अब्दालीसाठी संजय दत्त हेच नाव पक्क होतं”, असं गोवारीकर सांगतात. तर “संजय दत्त कॅमेरावर ‘लार्जर दॅन लाइफ’ दिसतो”, अशा शब्दांत अर्जुन कपूरने त्याची प्रशंसा केली. क्रिती सनॉन संजय दत्तविषयी म्हणाली, “मला त्यांचं व्यक्तिमत्त्व फार आवडतं. त्यांच्याकडे पाहून थक्क व्हायला होतं. खलनायक शक्तीशाली असला तर युद्धात मजा येते. संजय दत्तशिवाय दुसरा कोणता अभिनेता ही भूमिका साकारू शकला असता असं मला वाटत नाही.”

आणखी वाचा : ‘शंकरा रे शंकरा’; अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेला ‘पानिपत’ येत्या ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.