ऐतिहासिक चित्रपट आणि वादविवाद हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. विविध संघटनांकडून या धमक्या मिळत असून गोवारीकरांच्या सुरक्षेसाठी २०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

ऐतिहासिक घटनांची छेडछाड करुन चित्रपटात दाखवल्याचा आरोप या संघटनांनी गोवारीकर यांच्यावर केला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

या वादावर आशुतोष गोवारीकर म्हणाले, “जेव्हा पण आम्ही ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करतो, तेव्हा चित्रपटाच्या कथेत कोणता भाग दाखवण्यात येणार आहे यावरून वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. इतिहासाच्या पुस्तकात बरीच पानं असतात, पण प्रत्येक गोष्ट चित्रपटात दाखवणं शक्य नसतं. एका ठराविक वेळेत ठराविक गोष्ट दाखवावी लागते.”

मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आधारित आहे. अर्जुन, क्रितीसोबतच संजय दत्त यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. संजय दत्त यात अहमद शाह अब्दालीची साकारत आहे.