सगळेच पराभव विसरण्यासारखे नसतात. काही पराभव नावाला पराभव असले तरी तुम्हाला अजरामर करुन जातात. अशाच एका पराभवाबद्दलचा इतिहास रुपेरी पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावरचा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याचा फर्स्ट पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. यामध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ज्या युद्धाने इतिहास बदलला, त्याचे साक्षीदार व्हा’, असं कॅप्शन देत अर्जुनने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहे. २०१६ मध्ये ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटानंतर आता त्यांचा ‘पानिपत’ प्रदर्शित होणार आहे. ‘मोहेंजोदारो’ने बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई केली नव्हती. मात्र आता ‘पानिपत’विषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने या चित्रपटाला संगीत दिले आहे.