मानसी जोशी

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शिक ‘पानिपत’ चित्रपटाचे प्रोमोज जाहीर झाले, तेव्हापासूनच या चित्रपटाचा नायक म्हणून अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवभाऊ ही भूमिका वादात सापडली. याआधी अभिनेता रणवीर सिंग याने बाजीरावाची जी भूमिका साकारली होती, त्याची तुलना अर्जुन कपूरच्या अभिनयाशी होऊ लागली आणि टीकेचा एकच ओघ सुरू झाला. मात्र या सगळ्यात कुठेही वादात न पडता शांतपणे आपल्या दिग्दर्शकावर संपूर्णपणे विश्वास ठेवून सदाशिवभाऊची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन कपूरने या चित्रपटाच्या निमित्ताने या ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा प्रवास, त्याची योद्धा म्हणून घडत गेलेली प्रक्रिया समजून घेत ते साकारण्याचा केलेला प्रयत्न हा आपल्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याचे सांगितले. सदाशिवभाऊ हे आक्रमक नव्हते, मात्र संयतपणे आपली युद्धनीती रचणारे उत्कृष्ट संघटक होते, असे तो म्हणतो.

इतिहासात बाजीराव पेशव्यांविषयी संदर्भ, माहिती मुबलक प्रमाणात आढळून येतात, परंतु  सदाशिवरावांबद्दल इतिहासात पुरेसे संदर्भ उपलब्ध नाहीत, त्यामुळे पडद्यावर सदाशिवराव साकारणे आपल्यासाठी एक आव्हान होते, असे अर्जुनने सांगितले. मात्र तरीही त्याने या भूमिकेसाठी होकार दिला. याबद्दल बोलताना तो म्हणतो, सदाशिवराव या व्यक्तिरेखेत एक उत्कृष्ट संघटक दडलेला होता. सर्व लोकांना संघटित करून शत्रूशी दोन हात करण्याचे त्यांचे स्वप्न होते. अतिशय शांत असणारा सदाशिव फार बोलत नाही, मात्र तो आपल्या कृतीतून खूप काही बोलून जातो. आणि नेमकी ही गोष्ट आपल्याला खूप भावली, असे तो सांगतो. अर्थात, या व्यक्तिरेखेसाठी पूर्णपणे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच ही भूमिका साकारली असल्याचे अर्जुनने सांगितले. ही भूमिका साकारताना त्यांच्यविषयी अनेक बाबी नव्याने समजल्याचेही त्याने स्पष्ट केले.

सदाशिवरावांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यामुळे ही भूमिका साकारताना थोडय़ाफार प्रमाणात मराठी उत्तम असणे गरजेचे होते. मी लहानपणापासून मुंबईत राहात असल्याने मला मराठी समजते, परंतु ती तितकी नीट बोलता येत नाही, असे अर्जुन सांगतो. त्यामुळे कर्जतच्या एन. डी. स्टुडिओत चित्रीकरण सुरू असताना मी चोवीस तास मराठी भाषा बोलत होतो. यामुळे माझी मराठी सुधारण्यास मदत झाली, असेही त्याने सांगितले.

सदाशिवराव यांची विचारसरणी, देहबोली, शरीरयष्टी पडद्यावर साकारण्यासाठीही आपल्याला मेहनत घ्यावी लागली, असे तो म्हणतो. मुळात ही व्यक्तिरेखा साकारताना माझ्या केसांना तिलांजली द्यावी लागली, असे तो म्हणतो. चित्रीकरणाच्या आधी केस काढून तुळतुळीत गोटा केला. मला माझे केस प्राणापेक्षाही प्रिय असल्याने ते काढताना खूप वाईट वाटले. आशुतोष गोवारीकर यांनी माझी विग लावून लूक टेस्ट केली. आणि तो माझा लूक  निश्चित झाला, अशी आठवणही त्याने सांगितली.

चिमाजी अप्पा आणि रखमाबाईंचे लाडके चिरंजीव असलेले सदाशिवराव युद्धकलेत पारंगत असून लेखणी, तलवारबाजी आणि घोडेस्वारीतही ते निपुण होते. त्यामुळे चित्रीकरणाच्या आधी या सगळ्याचे प्रशिक्षण अर्जुनने घेतले. चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी मी महिनाभर रोज सकाळी सहा वाजता महालक्ष्मी रेसकोर्सवर जाऊन घोडेस्वारी करत होतो. तिथे मी घोडय़ावर बसायला शिकलो. या एक-दोन महिन्यांत तिथला जब्बार हा घोडा माझा मित्र बनला होता. जिवलग मित्राशी जशा गप्पा मारतो तसे तासन्तास त्या घोडय़ाशी मी बोलत होतो. रेसकोर्सवरील जब्बार हा घोडा अत्यंत प्रेमळ होता आणि चित्रीकरण करतानाही तो माझा आवडता सहकलाकार होता, असे अर्जुनने सांगितले. लहानपणी माझे घोडेस्वारी करण्याचे स्वप्न होते. ‘पानिपत’च्या निमित्ताने हे स्वप्नही पूर्ण झाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला.

या चित्रपटातील भूमिका स्वीकारण्यापासून ते प्रत्यक्ष चित्रीकरणापर्यंतचा सगळाच प्रवास अवघड होता, पण गोवारीकरांमुळे तो सहजसाध्य झाला, असे तो म्हणतो. कुठल्याही चित्रपटाच्या यशात दिग्दर्शकाची भूमिका महत्त्त्वाची असते. ‘लगान’, ‘जोधा अकबर’ यांसारखे चित्रपट देणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांनी ‘पानिपत’चे दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी मला समोर ठेवून सदाशिवराव ही व्यक्तिरेखा लिहिली होती. इतका त्यांना माझ्यावर विश्वास होता, मात्र त्यांनी मला या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मी स्वत:च ती करू शकेन की नाही याबद्दल साशंक होतो, अशी प्रामाणिक कबुली अर्जुनने दिली. पण मी ते करू शके न, असा विश्वास गोवारीकर यांनी माझ्यात निर्माण केला. त्यांनी दीड वर्ष पानिपतच्या पटकथेवर काम के ले होते. त्यांनी सदाशिवराव पेशव्यांचा बारकाईने अभ्यास के ला होता. आणि मला भूमिका देण्याआधी त्यांनी माझेही सगळे चित्रपट पाहिले होते. त्यामुळे त्यांना मी ही भूमिका करू शकेन, यावर ठाम विश्वास होता. आणि दुसरं म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून चित्रपटातून काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहे, याबद्दल ते ठाम असतात. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात काम करणे सोपे जाते, असेही तो म्हणतो.

या चित्रपटाच्या वेळी सगळ्यात मोठे दडपण हे संजय दत्तबरोबर काम करण्याचे होते, असं अर्जुन सांगतो. संजयने यात अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे. संजयने पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका केली आहे, मात्र त्याच्या अभिनयाचा माझ्यावर पगडा असल्याने थोडे दडपण होते. पण चित्रीकरण सुरू झाल्यावर आम्ही अगदी जिवलग झालो, असा अनुभव तो सांगतो. संजय दत्तच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याच्या आईचे नर्गिस यांचे निधन झाले होते. तसेच ‘इशकजादे’ या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच आई मोना कपूरचे निधन झाले, याची आठवण करून देतानाच संजय आणि मला जोडणारा हा समान भावनिक धागा असल्याचे अर्जुन म्हणतो. माझ्या कुटुंबाचे आणि संजय दत्तचे चांगले संबंध आहेत, मात्र चित्रीकरण करताना एक वेगळा संजय दत्त पाहायला मिळाला, असेही तो सांगतो. ‘पानिपत’नंतर नवीन वर्षांत अर्जुन कपूर दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात झळकणार आहे.

‘आई हे माझे सर्वात मोठे बलस्थान’

आईचा विषय निघाल्यावर अर्जुन कपूर भावूक होतो. नुकतेच समाजमाध्यमांवर त्याने बारा वर्षांचा असताना केलेली कविता पोस्ट केली होती. मी आईच्या सर्वात जवळ होतो. ती आई कमी मैत्रीण जास्त होती. माझ्या आयुष्यातील घडलेले चांगले वाईट प्रसंग तिला माहिती होते. आईनंतर बहीण अंशुलाला सगळ्या गोष्टी सांगतो. आज सर्वात जास्त आईची आठवण येते, असे तो सांगतो. ‘इशकजादे’ चित्रपटापासून आतापर्यंत अर्जुनच्या विचारसरणीत, अभिनयात प्रचंड बदल झाले आहेत. आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग पाहिलेल्या अर्जुन कपूरला परिस्थितीची जाणीव आहे. आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येतात, मात्र यातही खचून न जाता काम करत राहायचे हे मी शिकलो आहे. चुका करणे हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे जीवनात चुका केल्या तरी त्यातून योग्य ते धडे घ्या. तसेच पुढील वेळेस त्याची पुनरावृत्ती करू नका, असा प्रेमळ सल्लाही त्याने दिला.