संयमी व तितकाच प्रभावशाली अभिनय करणारा अभिनेता म्हणून पंकज त्रिपाठीची ओळख आहे. पंकजने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहतात. त्यातही अॅमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये त्याने साकारलेली ‘कालीन भैय्या’ची भूमिका विशेष गाजली. या वेब सीरिजला एक वर्ष पूर्ण झाले असताना पंकजने ‘इन्स्टाग्राम’ या फोटो शेअरिंग अॅपवर पदार्पण केलं आहे.

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातली दरी कमी होते. चाहत्यांशी सहज संवाद साधण्यासाठी आजकाल कलाकार सोशल मीडियाचा वापर करतात. काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर लोकप्रिय असतात तर काही जण अद्यापही त्यापासून दूर आहेत. पंकजने इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून नेटकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. या अकाऊंटच्या ‘बायो’मध्ये पंकजने अभिनेता हिंदी सिनेमा असं लिहिलं आहे. त्याचसोबत त्याने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला. पंकजची पहिली पोस्ट काय असणार याबद्दलची उत्सुकता असतानाच त्याने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. ‘मिर्झापूर २’ या आगामी वेब सीरिजचा टीझर त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडल्यानंतर काही तासांतच त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली आहे. पंकजने अद्याप कोणालाही फॉलो केलेलं नाही. पंकजच्या इन्स्टाग्रामवर पदार्पणानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.