कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील नावाजलेल्या मंडळींची दुसरी बाजू बघण्याची संधी मिळत आहे. कार्यक्रमात या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन बहिणी म्हणजेच पूनम महाजन आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत बेधडक गप्पा रंगणार आहेत. या दोघींनीही मकरंद अनासपुरेशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी काही उत्तरं बेधडक तर काही उत्तरं खुसखुशीत पद्धतीने दिली.

कार्यक्रमात पूनम महाजन यांनी शबरीमला प्रकरणावर आपलं मत मांडलं. ‘विश्वास, धर्म यावर कशापद्धतीने वाटचाल करावी आणि कसं त्याला पुढे घेऊन जावं हे फार महत्त्वाचं असतं. कोर्टाने ठरवलं आणि दरवाजे उघडले, जनतेने ठरवले म्हणून दरवाजे बंद आहेत, केरळमध्ये काय करावं हे सरकारला ठरवता येत नाहीये. भारत सुंदर लोकशाही असलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, भाषा आहेत, त्यामुळे निर्णय घ्यायला आणि बदल व्हायला वेळ लागतो,’ असं त्या म्हणाल्या.

वाचा : तो प्रसंग माझ्यासाठी टर्निंग पॉईंट- तुकाराम मुंढे

कार्यक्रमात मकरंदने दोघींना काही गमतीशीर प्रश्नदेखील विचारले. दोघींना काही म्हणी सांगितल्या आणि त्यावर कोणता राजकीय चेहरा डोळ्यांसमोर येतो असं विचारलं. ‘नाचता येईना अंगण वाकडे’, ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ या म्हणी विचारल्या. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं हे येत्या गुरुवार आणि शुक्रवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘चक्रव्यूह राऊंड’मध्ये काही राजकारणाशी संबंधीत माणसांबद्दल आवडणारी आणि खटकणारी गोष्ट दोघींना विचारली. तर दोघींना ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘शोले’ चित्रपटातील संवाददेखील त्यांच्या अंदाजात म्हणायला सांगितले आहेत. इथेच ही धम्माल संपली नसून या दोघींना अजून काही प्रश्न देखील विचारले. राजकारणातला आवडता दादा कोण, अजितदादा पवार की धनंजय मुंडे? संसदेत कोणाचं भाषण आवडतं, सुषमा स्वराज की स्मृती इराणी? भाजपा सोडून कुठला पक्ष आवडतो, राष्ट्रीय काँग्रेस की मनसे? आता या प्रश्नांची उत्तर त्यांनी काय दिली हे येत्या भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.