News Flash

कागदी भावनांचा खेळ

‘कागज’मध्ये मांडलेला संघर्ष हा वास्तव कथेवरून प्रेरित आहे, हा चित्रपट रूढार्थाने कोणाचीही आत्मकथा नाही.

|| रेश्मा राईकवार

‘मी जिवंत आहे… तुमच्यासमोर धडधाकट उभा आहे…’, असा कितीही कं ठशोष के ला तरी सरकारी कागदावरचे सत्य तेच चिरंतन सत्य मानणारी सरकारी यंत्रणा किती ढिम्म आणि उदासीन असू शकते. आपुलेचि मरण पाहिले म्या डोळा… अशा अवस्थेत एखाद्याचे आयुष्य कापरासारखे नुसतेच उडून जाते. तरीही धुळीत पडलेल्या एका कागदी कपट्याला असलेल्या ‘सरकारी’ मूल्यापुढे जितेजागते आयुष्य कवडीमोलच ठरते, हे वास्तव मांडणारा सतीश कौशिक दिग्दर्शित ‘कागज’ हा चित्रपट ‘झी ५’वर प्रदर्शित झाला आहे.

‘कागज’मध्ये मांडलेला संघर्ष हा वास्तव कथेवरून प्रेरित आहे, हा चित्रपट रूढार्थाने कोणाचीही आत्मकथा नाही. मात्र अशा अनेक सरकारी कागदावर मृत झालेल्या व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत आहेत आणि अजून कागदावरही आपण जिवंत व्हावं यासाठी संघर्ष करत आहेत, हे वास्तवच फार भयंकर आहे. आजमगढमध्ये राहणाऱ्या भरतलालचा बँडबाजाचा व्यवसाय आहे. गावात छोटेखानी दुकानात आपली वाद्ये, कपडेपट सगळे सांभाळून ठेवत, नवनवीन गाणी वाजवायला शिकत-शिकवत तो आपल्या व्यवसायात रमला आहे. त्याने आपला हा व्यवसाय आता मोठा करावा, असा सल्ला त्याला गावकऱ्यांकडून मिळतो. अगदी पत्नीकडूनही जेव्हा कर्ज घेऊन व्यवसाय मोठा करण्याची सूचना येते, तेव्हा भरतलाल त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू करतो. बँके कडून कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे कागदपत्रे आणण्यासाठी तो मूळ गावी पोहोचतो. त्याच्या हाती कागदपत्रं तर लागतच नाहीत, उलट भरतलाल नावाची व्यक्ती कधीच मृत झाली आहे आणि त्याची जमीन त्याच्या चुलतभावांच्या नावावर झाली आहे, असा शोध त्याला लागतो. तलाठी कार्यालयापासून ते जिल्हा परिषद, मुख्यमंत्री, पंतप्रधान सगळीकडे पत्र लिहून भरतलाल आपली कहाणी ऐकवत राहतो. तलाठी कार्यालयात जा, तुमचे काम नक्की होईल, हा फु काचा आशावाद त्याला दरवेळी त्याच कागदावर घेऊन येतो. या सगळ्या प्रक्रियेत कितीक वर्ष निघून जातात. माझ्यावर अन्याय झाला आहे, मी जिवंत आहे आणि कोणीतरी विनाकारण मला मृत ठरवून गैरफायदा घेतो आहे. मी हा अन्याय सहन करणार नाही, या इरेला पेटलेल्या भरतलालला त्याची पत्नी सोडून जाते. दुकान विकावे लागते, बँडबाजाचा व्यवसायही संपतो, कफल्लक परिस्थितीला पोहोचलेला भरतलाल आणखी गरीब होत जातो आणि त्याचा खटला चालवणाऱ्या वकिलाची परिस्थिती मात्र सुधारत जाते. सरकारी यंत्रणा म्हणजे त्यात काम करणारी माणसंच की… पण सरकारी नियमांचा दाखला देत मुर्दाडपणे वागणाऱ्या यंत्रणेला माणसाचा आवाज ऐकू च जात नाही बहुधा… माणसापेक्षा सरकारी कागद किती खरा आहे हे सिद्ध करण्यात यंत्रणा खर्ची पडते. या वास्तवाचे सहजचित्रण ‘कागज’मध्ये पाहायला मिळते.

मुळातच, चित्रपटात दाखवलेला संघर्ष खरा आहे त्यामुळे तो मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. पण त्याचे अधिक चांगले चित्रण दिग्दर्शकाला करता आले असते. सतीश कौशिक यांनीच चित्रपटाची कथा लिहिली आहे. आणि त्यांची दिग्दर्शनाची शैली ही खोलात जाऊन चित्रण करणारी नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणांचा कारभार, ठुमक्यावरचे नाचगाणे आणि त्यात रमलेली राजकीय मंडळी, अन्यायग्रस्ताची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न करणारा कोणी एखादा पत्रकार, एखाद्याला आपल्याशी बांधून ठेवत कधीतरी त्याचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेणारी नेतेमंडळी अशा अनेक गोष्टी कथेच्या ओघात त्याच नेहमीच्या ठोकळेबाज पद्धतीने आपल्यासमोर येतात. हा सगळा भाग आपण याआधीही अनेकदा चित्रपटांमधून पाहिलेला आहे, त्यामुळे नेहमीच्या सवयीप्रमाणे तो आपण पाहत राहतो. तरीही कौशिक यांनी आपल्या इतर हिंदी चित्रपटांप्रमाणे अगदी तडकभडक मांडणी आणि भावनिक नाट्य टाळले आहे. त्याला पंकज त्रिपाठी यांच्या सहजअभिनयाची जोड मिळाल्याने भरतलालची कथा अधिक खरी वाटते. पंकज त्रिपाठींबरोबरच त्यांच्या पत्नीच्या भूमिके त असलेल्या अभिनेत्री मोनल गज्जरचेही काम चांगले झाले आहे. बाकी खुद्द सतीश कौशिक यांच्यासह अमर उपाध्याय, मिता वसिष्ठ यांच्यासारखे काही जुने चेहरे या चित्रपटात पाहायला मिळतात. कागदावर रंगलेला हा जगण्या-मरण्याचा खेळ कु ठेतरी आपल्याला विचार करायला लावतो हेही नसे थोडके !

कागज

दिग्दर्शक – सतीश कौशिक,  कलाकार – पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर, सतीश कौशिक, मिता वसिष्ठ, अमर उपाध्याय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:04 am

Web Title: paper emotion game life film was released on zee 5 kaagaz akp 94
Next Stories
1 बहुकलाकारी! वेबमालिकांची
2 ‘मास्टर’ची तीन दिवसांत ५४ कोटी रुपयांची कमाई
3 बॉक्सऑफिसचे ‘तांडव’ नको!
Just Now!
X