‘चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ (सीएफ एसआय)ची निर्मिती असलेल्या ‘पप्पू की पगडंडी’ या चित्रपटाची निवड ‘टोराण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आहे. कॅनडामध्ये ७ ते १९ एप्रिलदरम्यान होणाऱ्या टोराण्टो आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात सीमा देसाई दिग्दर्शित ‘पप्पू की पंगडडी’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
जगभरात लहान मुलांसाठी आयोजित के ल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये टोरांटोचा बालचित्रपट महोत्सव सर्वात मोठा आहे. या महोत्सवासाठी ‘पप्पू की पगडंडी’ चित्रपटाची निवड झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, असे सीएफएसआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रावण कुमार यांनी सांगितले. २०१३ मध्ये चिल्ड्रेन फिल्म सोसायटीच्या ‘गोपी गवैया बाघा बजैया’ या अॅनिमेशनपटाचा टोराण्टो महोत्सवातच भव्य प्रीमिअर करण्यात आला होता. आता याच महोत्सवात ‘पप्पू की पगडंडी’ची निवड झाली असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सीमा देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या ९० मिनिटे लांबीच्या चित्रपटात पप्पू नावाच्या लहान मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गातील कु टुंबातून आलेला पप्पू नव्या शाळेमध्ये स्वत:ला जुळवून घेतो आहे. त्याच वेळी त्याचे एका जिनीसोबत सुरू असलेला संवाद हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. आनंदाला शॉर्टकट्स नसतात. आपला आनंद आपल्यालाच शोधायचा असतो, असा सकारात्मक संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे कुमार यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत चिल्ड्रेन फिल्म सोसायटीचे चित्रपट व्यावसायिक रीत्या प्रदर्शित करण्यातही आपल्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ मध्ये सोसायटीने ‘गट्टू’ हा पहिला चित्रपट व्यावसायिकरीत्या प्रदर्शित केला. त्यानंतर ‘गोपी गवैया बाघा बजैया’ हा चित्रपट, ‘कफल’ या चित्रपटाला ‘बेस्ट चिल्ड्रेन फिल्म’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, अशी माहिती डॉ. श्रावण कुमार यांनी दिली.