दिवंगत गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. चंद्रकांत लिमये यांनी स्थापन केलेल्या ‘वसंतराव देशपांडे संगीत सभे’तर्फे आयोजित ‘परंपरा दर्शन’या कार्यक्रमात वेगवेगळ्या घराण्यांची गायकी उलगडली गेली. वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वत: चंद्रकांत लिमये यांच्यासह तीन युवा गायकांनी आपली गायन कला सादर केली.
कार्यक्रमात जयपूर-ग्वाल्हेर परंपरेच्या कु. दीपिका भिडे यांनी जौनपुरीमध्ये जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका दिवंगत धोंडूताई कुलकर्णी यांच्या आठवणी जागविल्या तर त्यानंतर देस रागात ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेचे दर्शन घडविले. सुनील पंडित यांनी नरभैरव राग तर स्वानंद भुसारी यांनी रामकली राग सादर केला तसेच वसंतराव देशपांडे यांच्या परंपरेचे दर्शन घडविले. पं. लिमये यांनी दाक्षिणात्य संगीतातून हिंदूुस्थानी संगीतात आलेला वसंतराव देशपांडे यांचा ‘सालगवराळी’ हा खास राग सादर करून वसंतराव देशपांडे यांच्या समग्र गायकीचे दर्शन घडविले. अतुल ताडे (तबला), यती भागवत (तबला) आणि मकरंद कुंडले (संवादिनी) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ तबलालादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या तबला वादनाने झाली आणि त्यांनीही आपल्या वेगळ्या शैलीचे दर्शन उपस्थितांना घडविले.
पं. तळवलकर यांना कु. सावनी तळवलकर, चिन्मय कोल्हटकर, गोविंद भिलारे, नागेश यांनी अनुक्रमे तबला, संवादिनी, पखवाज आणि गायनाची साथ केली.