– मराठी चित्रपटांतून हिंदीत सीमोल्लंघन करणाऱ्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ फेम दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण वाघा बॉर्डरवर सुरू झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटानंतर जवळपास पाच वर्षांनी परेश मोकाशी यांनी लहान मुलांच्या विश्वात नेणारा ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट केला होता. त्यानंतर नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच परेश मोकाशी यांनी हिंदी चित्रपट दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला आहे. आपल्या पहिल्याच हिंदी चित्रपटात सीमेभोवती घुटमळणारे कथानक निवडणाऱ्या परेश मोकाशी यांनी थेट वाघा बॉर्डरवर चित्रीकरणही सुरू केले आहे. या वर्षी परेश मोकाशींबरोबरच ‘टाइमपास’ आणि ‘बीपी’ फे म दिग्दर्शक रवी जाधवही हिंदीत पदार्पण करणार आहे.
– मराठीतून हिंदीकडे वळताना दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांनी नेहमीच्या साचेबद्ध कथानकोंना पूर्ण फाटा देत राजकीय उपहासात्मक विषयाची निवड केली आहे. ‘भयकथा हीर-रांझा की’ असे या चित्रपटाचे नाव असून दोन देशांच्या सीमारेषेविषयी असलेल्या अज्ञानातून सर्वसामान्य माणसांचा उडणारा गोंधळ आणि त्यातून या देशीचे पाहुणे त्या देशी गेल्यानंतर घडणारे परिणाम उपहासात्मक शैलीत मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या नावात ‘हीर-रांझा’ असले तरी प्रत्यक्षात कथेचा त्याच्याशी तिळमात्रही संबंध नाही, असे परेश मोकाशी यांचे म्हणणे आहे. बऱ्याचदा गोंधळामुळे एखादा माणूस सीमेपलीकडे असलेल्या शत्रूच्या प्रदेशात जाऊन पोहोचतो. आणि मग त्याचा कोणताही गुन्हा नसताना त्याला दहशतवादी म्हणून किंवा दुसऱ्या देशाचा गुप्तहेर म्हणून छळ केला जातो. दोन देशांमधली राजकारणाचा अजब फटका हा त्या देशातील सामान्य माणसाला भोगावा लागतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे
– ‘भयकथा हीर-रांझा की’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय सीमेभोवती घडतो. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिग्दर्शक परेश मोकाशी आणि त्यांची टीम सध्या वाघा बॉर्डरवर पोहोचली आहे. मराठीतील दोन दिग्दर्शक या वर्षी हिंदीत पदार्पण करणार आहेत. दिग्दर्शक रवी जाधव यांच्याही पहिल्या हिंदी चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. ‘बेंजो’ असे त्यांच्या हिंदी चित्रपटाचे नाव असून आपल्या पहिल्या हिंदी चित्रपटातून मराठी संस्कृतीचे प्रतिबिंब उमटेल, असा दावा रवी जाधव यांनी केला आहे.