करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. तसेच देशाला आर्थिक मदत करण्यासाठी सर्वचजण पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला.

“आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचे आहे ते सगळे केले पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…” असे ट्विट करत बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली. अक्षयच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.

अक्षय कुमारने मदत जाहिर केल्यानंतर अभिनेते परेश रावल यांनी अक्षयला कॅनेडियन म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी लगेच ट्विटरवर ट्विट करत सतत अक्षयला कॅनेडियन म्हणणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

परेश रावल यांनी ट्विटमध्ये अक्षयने हे सर्व स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा राजकारणात करिअर करण्यासाठी केलेले नाही. तो एक चांगला माणूस आहे जो वेळेवर त्याचा टॅक्स भरतो आणि आनंदाने गरजूंना मदत करतो. तरी देखील काही लोक त्याला कॅनडाचा नागरिक असल्याचे म्हणतात. असे म्हणत परेश रावल यांनी अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.

फक्त अक्षय कुमारच नाही तर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपती मदतीसाठी पुढे येत आहेत. मदतीसाठी हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. . हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्माने पंतप्रधान मदत निधीमध्ये ५० लाख रुपयांची रक्कम दान केल्याची माहिती दिली आहे. तसेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. प्रभास, पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.