‘कलाकारांना हिरो म्हणू नका तर लष्करी जवान आणि पोलीस यांना म्हणा’, असं वक्तव्य करुन अभिनेता परेश रावल यांनी जनतेला आवाहन केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर परेश रावल यांच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होणारे परेश रावल कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात.

यातच त्यांनी देशासाठी सीमेवर लढणारे जवान आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर असणाऱ्या पोलिसांप्रती यांच्याविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केली आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. त्याच पार्श्वभूमीवर परेश रावल यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

“खरं तर आपण कलाकारांना एन्टरटेनर म्हटलं पाहिजे आणि लष्करी जवान, पोलीस यांना हिरो म्हटलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला खरे हिरो कोण हे समजलं पाहिजे, त्यामुळे हा बदल नक्कीच केला पाहिजे”, असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या परेश रावल यांची जोरदार चर्चा सुरु आहे. अनेक वेळा ते सोशल मीडियावर बेधडकपणे वक्तव्य करत असतात. अलिकडेच त्यांनी प्रसिद्ध लेखक रामचंद्र गुहा यांच्याविषयी टीकास्त्र डागलं होतं.