बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकपटांचे वारे वाहात आहेत. येत्या काळात पृथ्वीराज, मैदान, 83, सायना, सरदार उधम सिंग असे अनेक चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादीत आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडली आहे. हा चित्रपट भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते परेश रावल अब्दुल कलाम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. “मी अब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी आगामी चित्रपटाबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.
In my humble opinion he was SAINT KALAM !i am so blessed and fortunate that I will be playing KALAM Saab in his biopic . https://t.co/0e8K3O6fMB
— Paresh Rawal (@SirPareshRawal) January 4, 2020
भारताचे लाडके व्यक्तिमत्व डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखलं जायचं. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख असणारे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.
- अब्दुल कलाम यांचे संपुर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.
- भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.
- कलाम यांना करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. १९६३ साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले.
- भारताचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
- १९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून रोजी त्यांनी देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
- राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता. पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सौरऊर्जे शिवाय भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते.
- अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.
- अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.
- जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं.
- एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते.
- एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता.
- एकदा ४०० विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांच्यामधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.
- राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राजभवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2020 2:22 pm