बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्राच्या ‘संदीप और पिंकी फरार’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या २० मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे निर्मात्यांनी प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूने सध्या जगभरात थैमान घतला आहे. जवळपास ९० देशांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सिनेमागृहं देखील बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहे. त्यामुळे याचा आर्थिक फटका सिनेसृष्टीला बसत आहे. यापूर्वी ‘सूर्यवंशी’, ‘जेम्स बॉण्ड: नो टाईम टू डाय’, ‘ब्लॅक विडो’ अशा अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटाचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी याने केलं आहे. या चित्रपटाविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणालेला की, आपला देश सध्या भारत विरुद्ध इंडिया अशा द्विधा अवस्थेत आहे. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात पाहावयास मिळेल. ‘संदीप और पिंकी फरार’चे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी करत असून, अर्जुन त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहे.