अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमधले प्रेमसंबंध आता आपल्याला काही नवीन नाहीत. फार जुन्या काळापासून मन्सूर अली खान पतौडी-शर्मिला टागोर, मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी अशी अनेक उदाहरणे आपण पाहत आलो आहोत. अलीकडच्या काळात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमसंबंधही चांगलेच गाजताना दिसतायत. या यादीमध्ये प्रियांका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा आणि भारताचा नवोदित खेळाडू हार्दिक पांड्या यांची भर पडतेय की काय, अशी चर्चा काही दिवसांपासून रंगत असल्याचे पाहायला मिळतेय.

वाचा : मराठीतील ‘बॉईज’ला अमिताभ बच्चन यांचा शुभाशीर्वाद

सोशल मीडियावर परिणीती आणि हार्दिकमध्ये झालेल्या संभाषणामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात परिणीतीला, तू हार्दिकला डेट करत आहेस का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, मी अजूनही सिंगल आहे की नाही हा मुळात चर्चेचा विषयच नाही. पण मी नक्कीच हार्दिकला डेट करत नाहीये. आज संध्याकाळीच या अफवा माझ्या कानावर पडल्या. तेव्हा, वाह! हे माझ्या आयुष्यात केव्हा घडले, असे मी स्वतःलाच म्हणाले. परिणीतीच्या या वक्तव्यामुळे तिच्या आणि हार्दिकच्या रिलेशनवर बोलणाऱ्या नेटीझन्सना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल, असे म्हणण्यास हरकत नाही.

वाचा : आशाताई ‘आम्ही ठाकरं…’वर ठेका धरतात तेव्हा

परिणीती चोप्राने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना एक कोडं घालण्याचा प्रयत्न केलेला. फोटोला तिने ‘लव्ह इज इन दी एअर’ असे कॅप्शन दिलेले. मात्र, हे कोडं उलगडताना नेटिझन्सनी वेगळेच तर्कवितर्क लावले. परिणीती आणि हार्दिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या.