‘डिप्रेशन’ म्हणजेच नैराश्य हा सध्याच्या काळात एक गंभीर आजार झाला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती ही कशा ना कशाच्या मागे पळताना दिसते. पण या शर्यतीत जर आपण कुठे मागे राहिलो किंवा अपयश मिळालं तर नैराश्याने ग्रासून जातो. यातही बॉलिवूड आणि डिप्रेशनचं जवळचं नातं आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सतत नैराश्याचे शिकार होताना दिसतात. दीपिका पदुकोण, इलियाना डिक्रूझ, करण जोहर, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, टायगर श्रॉफ, मनिषा कोयराला अशी कलाकारांची मोठी यादीच आहे जे नैराश्याने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री परिणीती चोप्रानेही नैराश्याबद्दल खुलासा केला होता. दीड वर्ष नैराश्याशी झुंज दिल्याचा अनुभव परिणीतीने एका मुलाखतीत सांगितला होता.

“२०१४चा शेवट आणि संपूर्ण २०१५ हे वर्ष, माझ्यासाठी सर्वांत वाईट काळ ठरला होता. दावत-ए-इश्क आणि किल दिल हे माझे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते. आयुष्यात पहिल्यांदाच पराभवाला सामोरं गेले होते. त्याचवेळी हातातून पैसासुद्धा गेला. जे काही पैसे होते त्यातून नवीन घर घेतलं होतं आणि काही गुंतवणूक केली होती. त्याचवेळी माझं ब्रेकअप झालं होतं. आयुष्यात सर्वच गोष्टी चुकीच्या घडत होत्या. सकारात्मक अशी एकही गोष्ट दिसत नव्हती,” असं परिणीतीने सांगितलं होतं.

नैराश्याचा हा काळ कसा घालवला याबद्दल तिने पुढे सांगितलं, “माझं खाणं-पिणं, झोपणं कमी झालं होतं. लोकांशी भेटणं कमी केलं. मित्रमैत्रिणी, कुटुंबीय सर्वांशी संपर्क तोडला होता. कुटुंबीयांशी दोन आठवड्यातून एकदा बोलायचे. मी फक्त माझ्या रुममध्ये दिवसभर टीव्ही बघत बसायचे. चित्रपटात एखादी नैराश्यग्रस्त मुलगी ज्याप्रकारे दाखवतात, तशीच मी वागू लागले होते. या काळात भाऊ सहज आणि मैत्रीण संजना बत्रा यांनी फार साथ दिली. मी दिवसातून दहा वेळा रडत बसायचे. सतत रडल्यामुळे छातीत दुखू लागलं होतं.”

नैराश्याच्या या काळानंतर २०१६ पासून नवी सुरूवात केल्याचं परिणीतीने सांगितलं. त्यावेळी तिला ‘गोलमाल अगेन’ आणि ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटांचे ऑफर्स मिळाले होते. त्याचवेळी ती नवीन घरात राहायला गेली आणि आयुष्याची एक नवीन सुरुवाती तिने केली. आता पुन्हा एकदा आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्या तरी त्यांना सामोरं जायची पूर्ण तयारी असल्याचं तिने सांगितलं.