शरीरावर असणारे व्रण किंवा स्ट्रेचमार्क्स सहसा कोणाला आवडत नाहीत. त्यामुळे अनेकजण क्रीम किंवा सर्जरीच्या माध्यमातून ते मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अभिनेत्री परिणीती चोप्राने स्ट्रेचमार्कमध्ये लपवण्यासारखं काहीच नसल्याचं दाखवून दिलं आहे.

सध्या फिटनेसकडे सर्वांचाच कल असणाऱ्या या दिवसांमध्ये परिणीती मात्र तिच्या एका फोटोने ट्रेंडमध्ये आलीये. कलाकार मंडळी तर फिट बॉडीसाठी जीममध्ये घाम गाळत असल्याचे आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमधून पाहावयास मिळते. याच कलाकारांमध्ये परिणीतीचाही समावेश होतो. परिणीतीचा ‘फॅट टू फिट’ प्रवास अनेकांनाच प्रेरणा देणारा आहे. चित्रपटांतून ब्रेक घेऊन तिने आपल्या शरीरयष्टीवर मेहनत घेतली. त्याचाच परिणाम म्हणजे तिची शरीरयष्टी. याचसोबत तिने आणखी एक बोल्ड पाऊल उचलत तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तसा साधा वाटत असला तरी त्यातील एका गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले.

वाचा : हार्दिक पांड्या बिग बॉसच्या या माजी स्पर्धकाला करतोय डेट?

या फोटोत परिणीतीच्या कमरेवर स्ट्रेचमार्क असल्याचे पाहायला मिळते. एक सेलिब्रिटी असूनही तिने मेकअपने स्ट्रेचमार्क न लपवता ते मिरवले आहेत. त्याचमुळे तिच्या चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी तिची प्रशंसा केली. काही दिवसांपूर्वीच करिना कपूरला या कारणामुळे फटकारण्यात आले होते. एका प्रसिद्ध मासिकासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये करिनाचे स्ट्रेचमार्क आधुनिक तंत्राच्या मदतीने लपवण्यात आले होते. त्यामुळे, स्ट्रेचमार्कविषयी न्यूनगंड बाळगणाऱ्या अनेक व्यक्तींसाठी परिणीतीने उचलेले पाऊल प्रशंसनीय आहे.

वाचा : त्यांच्यावरचा राग मी खिल्जीच्या भूमिकेतून व्यक्त केला- रणवीर सिंग

परिणीती अक्षय कुमारसह ‘केसरी’ आणि अर्जुन कपूरसह ‘संदीप और पिंकी फरार’, ‘नमस्ते कॅनडा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अर्जुन आणि परिणीतीने २०१२ साली ‘इश्कजादे’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण केले होते.