X
निवडणूक निकाल २०१७

सीए ते मिसेस इंडिया पर्णिता तांदुळवाडकरचा प्रवास

मैत्रिणीने घेत तिला मिसेस इंडिया या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले

स्त्रिया या आदिशक्तीचं रूप आहे, असं नेहमीच म्हटलं जातं. स्त्रिया या फक्त स्वतःचाच नाहीतर आपल्यासोबत कुटुंबाचाही विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष देतात. करिअर घडवताना त्या आपल्या भविष्याचा विचार करीत असतात. स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी फार महत्वाच्या असतात. या दोन्ही गोष्टींपैकी कोणत्याही एका गोष्टीत अडथळा आला कि नैराश्य येतं. पण अशाच येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून आपली एक वेगळी ओळख घडवणाऱ्या स्त्रिया या कर्तृत्वान असतात. पर्णिता तांदुळवाडकर ही अशीच एक महिला, जिने परिस्थिती समोर हार पत्करली नाही. आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करून मिसेस इंडियापर्यंत त्यांनी बाजी मारली.

पर्णिता अगदी सुखवस्तू घरात जन्माला आली. अभ्यासात हुशार असलेल्या पर्णिताने बारावीनंतर सीए व्हायचं स्वप्न पहिलं. कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या पर्णिताला या क्षेत्रात काही रुची राहिली नाही. याच दरम्यान तिचे लग्न झाले, लग्नानंतरचा काही काळ संसाराची घडी बसवण्यात गेला.

घर सांभाळताना अभ्यास सुरु ठेवला पण यात तिला काही यश मिळत नव्हतं. लग्न, घर, मुल या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडत असताना करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे पर्णिता फार चिंतेत होती. या मनस्थितीत असताना तिने भावाच्या जीममध्ये जाणं सुरु केलं. बाळंतपणामध्ये वाढलेल्या वजनावर नियमित व्यायामाने तिने नियंत्रण ठेवले. कमी केलेल्या वजनाने तिला कमालीचा आत्मविश्वास दिला.

तिच्यातल्या या बदलाची दखल मैत्रिणीने घेत तिला मिसेस इंडिया या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. या स्पर्धेच्या ऑडीशनमध्ये तिची निवड झाली. या स्पर्धेमुळे तिच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. यानंतर मागे वळून न पाहण्याचा निर्धार करत तिने सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून करिअरला सुरुवात केली. मिसेस इंडिया या स्पर्धेच्या काळात तिला अनेक गोष्टी शिकवण्यात आल्या. अर्थात अशा स्पर्धांमध्ये स्पर्धकांना ग्रुम करण्यासाठी, त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रशिक्षक नेमला जातो. या स्पर्धेसाठी अंजना मार्क्सलीना या प्रशिक्षक होत्या. पर्णिताला या स्पर्धेत अंजनाची मोलाची साथ मिळाली.

मिसेस इंडियाचा किताब मिळाल्यानंतर तिने पर्सनालिटी ग्रुमिंगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सध्या ती सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून कार्यरत असून या क्षेत्रात बरीच स्थिर स्थावर झाली आहे. सॉफ्ट स्किल ट्रेनिंगमध्ये मेकअप ग्रुमिंगपासून ते वागण्या- बोलण्यातील बदल कसे करावे याविषयी मार्गदर्शन करण्यास तिने सुरुवात केली. पर्णिताने या ट्रेनिंगद्वारे कित्येकांना आपलं आयुष्य साकारण्यास मदत केली. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे समोरच्याला असलेलं दुःख हेरून त्यांना योग्य तो सल्ला ती देते. आपण राहतो कसे, दिसतो कसे, इतरांशी संवाद साधण्याचा स्वभाव, आपल्यातील कला सादर करण्याची भीती, एकलकोंडेपणा अशा विविध चिंतानी अनेकजण ग्रासलेले असतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे या गोष्टी घडत असतात. अशावेळी त्यांच्याशी योग्य तोच संवाद साधून, योग्य ट्रेनिंग देऊन त्यांना या त्रासातून बाहेर काढणं फार गरजेचं आहे.

सॉफ्ट स्किल या विषयाचे धडे शाळेपासूनच देण्यात यावे असे तिचे मत आहे, यासाठीच तिने अनेक शाळांमध्ये सॉफ्ट स्किल या विषयी माहिती तसेच स्वतः मधील आत्मविश्वास कसा वाढवता येईल याबाबतीत मार्गदर्शन केले आहे. मुळातच लहान मुले इतरांशी बोलायला तसेच आपल्यातील कला सादर करायला घाबरतात. या ट्रेनिंगमुळे समोरच्याला मोकळ करून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करता येतो. शाळेतच जर मुलांना अशा पद्धतीचे शिक्षण देण्यात आले तर करिअर निवडताना त्यांचा गोंधळ होणार नाही.

आपण स्वतःकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, स्वतःकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आपल्याला अनेक विकार जडतात. या विकारांपासून दूर राहायचं असेल तर आतापासूनच प्रत्येकांनी स्वतःकडे लक्ष द्यायाला सुरुवात करायला हवी. आपण आनंदी असतो तेव्हाच संपूर्ण घर आनंदी राहतं, असं पर्णिता आवर्जुन सांगते. सीएपासून सुरू झालेलं तिचं करिअर लग्नानंतर मिसेस इंडियाच्या किताबामुळे पुर्णपणे बदलून गेलं. या काळात त्यांना आलेल्या अडचणी, त्यातून तिने काढलेले मार्ग हे इतर स्त्रियांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

Outbrain