विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप निर्माण केली आहे. अनेक हॉलीवूडचे तंत्रज्ञ मराठी चित्रपटांना एक नवा साज चढवत आहेत.. आशय, विषय आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी चित्रपटांनी एक वेगळीच उंची गाठलेली आहे. वेगळ्या धाटणीच्या सत्य कथेवर आधारित असलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन देणाऱ्या ‘परतु’ या चित्रपटाने आता थेट वॉशिंग्टन येथे होणाऱ्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवात आपला झेंडा रोवला आहे. या महोत्सवासाठी ‘परतु’ या चित्रपटाची निवड झाली असून या चित्रपटाचे खास  स्क्रीनिंग या महोत्सवात होणार आहे. या स्क्रीनिंगला ‘परतु’ चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते किशोर कदम, अभिनेत्री स्मिता तांबे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या महोत्सवात अनेक चांगले चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. २५ ते २७ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाल, श्रीलंका या देशातील निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.चौथ्या वॅाशिग्टन डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवात परतु चित्रपटाची  निवड होणे ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, असे दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी सांगितले. ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’ ही नामांकित कंपनी ‘परतु’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत उतरली असून परतु सारखे दर्जेदार मराठी चित्रपट देश-विदेशांतील माध्यमांपर्यंत पोहचावेत यासाठी ‘परतु’ च्या टीमकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. देश-विदेशांतल्या बहुभाषिक प्रतिनिधींनी ‘परतु’ चित्रपटाचं चांगलचं स्वागत केलं असल्याचं सांगत दिग्दर्शक नितीन अडसूळ यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं. नात्यांमधील अनोखे बंध ‘परतु’ चित्रपटात पाहायला मिळतात. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे अशा दिग्गज कलाकारांच्या ‘परतु’  सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या महोत्सवाच्या दरम्यान अभिनेत्री अपर्णा सेन, कोंकणा सेन, रायमा सेन, अभिनेता दिग्दर्शक अनंत महादेवन असे इतरही नामवंत कलाकार उपस्थितीत राहणार आहेत. हा महोत्सव रितूपूर्ण घोष यांना समर्पित करण्यात आला आहे.