वेगळ्या धाटणीच्या सत्यकथेवर आधारलेल्या आणि भावनिक मूल्यांचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या हॉलीवूडच्या ‘इस्ट वेस्ट फिल्म्स’  या नामांकित कंपनीच्या ‘परतु’ या मराठी चित्रपटाने वॉशिंग्टन मधल्या चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये मानाचे पुरस्कार पटकावत आपली मोहोर उमटवली आहे. सशक्त कथाविषय आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘परतु’ चित्रपटाने हे यश मिळवलंय.

चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवामध्ये नितीन अडसूळ दिग्दर्शित ‘परतु’ चीच धूम पहायला मिळाली. या चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट अभिनेता ( किशोर कदम) आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट असे दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावत आपली ठसठशीत मुद्रा उमटविली. ‘परतु’ ने विदेशी चित्रपट रसिकांचीही भरघोस दाद मिळवली. विदेशी रसिकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. एक उच्च निर्मितीमूल्यांचा, चांगल्या आशयाचा सिनेमा पाहिल्याची भावना उपस्थित सर्वच रसिकांनी बोलून दाखवली. आंतरराष्ट्रीय ज्युरी, निवड समितीचे सर्व सदस्य व चित्रपटसृष्टीशी संबधित अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. २५ ते २७ सप्टेंबर यादरम्यान चौथ्या डी सी साउथ एशियन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील २८ चित्रपट या पुरस्कारांच्या अंतिम शर्यतीत होते.

या चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. संकलनाची जबाबदारी राजेश राव यांनी सांभाळली आहे. सत्यकथेवर आधारित असलेल्या ‘परतु’ चित्रपटात १९६८ ते १९८५ दरम्यानचा काळ रेखाटण्यात आला असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा कथाविषय या निमित्ताने पहाता येणार आहे. किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला रवी भारतीय आणि बालकलाकार यश पांडे यांच्या ‘परतु’ सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.