वेगळा आशय आणि विषय घेऊन मराठीत वेगवेगळे चित्रपट निर्माण होत आहेत. वॉशिंग्टन येथे २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवात ‘परतु’ चित्रपटाची निवड झाली आहे. या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग महोत्सवात होणार असून चित्रपटातील प्रमुख कलाकार किशोर कदम, स्मिता तांबे हे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका आदी देशातील निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘ईस्ट वेस्ट’ या कंपनीने ‘परतु’च्या माध्यमातून मराठी चित्रपटाच्या निर्मितीत प्रवेश केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन अडसूळ यांनी केले आहे.
मानवी नात्यातील अनोखे बंध उलगडण्याचा प्रयत्न ‘परतु’ या चित्रपटातून करण्यात आला असून चित्रपटात सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवमी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय, बाल कलाकार यश पांडे हे कलाकार आहेत.
या महोत्सवास अभिनेत्री अपर्णा सेन, कोंकणा सेन, अभिनेता व दिग्दर्शक अनंत महादेवन आदी उपस्थित राहणार असून हा चित्रपट महोत्सव रितूपर्ण घोष यांना समर्पित करण्यात आला आहे.