अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने २०१७ च्या अखेरीस सलमानच्या चाहत्यांना खास भेट दिली असे म्हणायला हरकत नाही. कतरिना आणि सलमानची भूमिका असणारा हा चित्रपट आणखी एका कारणामुळे गाजला. ते कारण म्हणजे चित्रपटातील साहसदृश्ये. कल्पनेपलीकडील साहसदृश्ये या चित्रपटात साकारण्यात आली असून, सुरुवातीपासूनच या दृश्यांची प्रचंड चर्चा पाहायला मिळाली. किंबहुना चित्रपटाच्या प्रसिद्धीतही त्या दृश्यांचा वापर करण्यात आला. त्याचा फायदा ‘टायगर…’च्या कमाईच्या आकड्यांमध्येही पाहायला मिळाला. पण, काही दिवसांपूर्वीच एक बातमी चर्चेत आली ती म्हणजे, ‘टायगर…’ मध्ये साकारण्यात आलेली साहसदृश्ये सलमानने केली नसून त्यासाठी त्याच्या ‘बॉडी डबल’चा वापर करण्यात आला होता.

परवेझ काझी नावाच्या या बॉडी डबल मॉडेलने ‘टायगर…’मध्ये थक्क करणारे स्टंट केल्याच्या चर्चा रंगल्या आणि अनेकांनीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटो पाहण्यासाठी गर्दी केली. परवेझने स्टंट केल्याचा खुलासा झाल्यानंतर अनेकांनीच तोच खरा टायगर असल्याचे मत मांडले. एका अर्थी यामुळे परवेझ प्रकाशझोतात आला असेच म्हणावे लागेल. पण, त्याला मात्र ही बाब अजिबातच पटलेली नाही.
सलमान ऐवजी लोक आपल्याला ‘टायगर’ म्हणून संबोधत असून, त्याने केलेल्या स्टंट्सचे श्रेय आपल्याला दिले जात असल्याचे लक्षात येता परवेझने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने काही खुलासे केले आहेत. एका वेबसाइटच्या बातमीचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या.

वाचा : ‘टायगर जिंदा है’चा असाही एक विक्रम, आमिरच्या ‘३ इडियट्स’ला टाकले मागे

https://www.instagram.com/p/Bdf5WEKF2–/

‘तुम्ही हा काय वेडेपणा लावला आहे? एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला काही माहिती नसेल तर कृपा करुन त्याविषयी काही बोलू तरी नका. मी हे सर्व फोटो माझ्या खासगी कामासाठी काढले आहेत. पण, याचा अर्थ असा होत नाही की चित्रपटातील साहसदृश्ये मी केली आहेत. या (टायगर जिंदा है) मधील सर्व साहसदृश्ये खुद्द सलमान खाननेच केली आहेत. माझ्या फोटोंचा वापर करुन उगाचच चुकीच्या चर्चांना वाव देऊ नका’, असे म्हणत त्याने या सर्व चर्चांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.