दुसऱ्या महायुद्धाने जगाच्या इतिहासावर फार मोठे परिणाम केले आहेत. वसाहतवाद, गुलामी, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या समाजाची पावले महायुद्धाच्या दिशेने वळली. गुलामगिरीने होरपळलेल्या समाजाला महायुद्धाच्या दिशेने ढकलण्यात हिटलरचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच आज त्याच्या नाझी विचारसरणीचा संपूर्ण जगभर विरोध केला जातो. परंतु पॉल हॉलीवूडसारखे काही लोक आहेत जे आजही हिटलरचे समर्थन करताना दिसतात. ५१ वर्षीय ब्रिटिश सेलेब्रिटी पॉल यांचा नाझी गणवेश परिधान केलेला फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या विरोधात टीकेची लाट उसळली. काही कलाकार सतत चर्चेत राहण्यासाठी काही ना काही उठाठेवी करत असतात. अशाच कलाकारांपैकी एक असणाऱ्या पॉल यांनी चमकोगिरीसाठी खेळलेली ही खेळी त्यांच्यावरच उलटली. परिणामी, त्यांना जाहीर माफी मागावी लागली. १९८० साली ‘बीबीसी’ वाहिनीवरून प्रदर्शित होणाऱ्या ‘आलो आलो’ या विनोदी मालिकेतील एका पात्राचे अनुकरण त्यांनी २००३ साली नववर्षांच्या पार्टीमध्ये केले होते. त्या पार्टीत नाझी गणवेश परिधान करून काढलेला तो फोटो त्यांनी जुन्या आठवणी म्हणून इंटरनेटवर अपलोड केला. परंतु या कृत्याबद्दल त्यांना माफी मागावी लागली आहे. हॉलीवूड यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला. त्यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने तो फोटो अपलोड केला नव्हता, असेही सांगितले. मात्र लोकांचा हिटलर द्वेष इतका आहे की इंटरनेटवरील तो फोटो हॉलीवूड यांनी काढून टाकला असून यापुढे असे कृत्य त्यांच्या हातून घडणार नाही, असे आश्वासनही त्यांना लोकांना द्यावे लागले आहे.