‘हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारलेले तसंच ‘चर्नोबिल’ या वेबसीरीजमधील बहुगुणी ब्रिटीश अभिनेते पॉल रिटर यांचं काल निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते आणि ब्रेन ट्युमर या आजाराशी झुंज देत होते.

ते ब्रिटीश दूरचित्रवाणीचा सुप्रसिद्ध चेहरा होते. त्यांनी ‘फ्रायडे नाईट डिनर’ या मालिकेत मार्टिन गुडमन ही लंडनमधल्या एका ज्यू परिवारातल्या कुटुंबप्रमुखाची, वडिलांची भूमिका साकारली होती. ‘चर्नोबिल’ या वेबसीरीजमध्ये त्यांनी अणु ऊर्जा प्रकल्पावरच्या एका इंजिनीयरची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर एँड हाफ ब्लड प्रिन्स’ या चित्रपटात पॉल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ‘क्वांटम ऑफ सोलेस’ या बाँडपटातही त्यांनी काम केलं होतं.

ब्रिटीश रंगभूमीवरचं त्यांचं कामही उल्लेखनीय आहे. ‘द ऑडियन्स’ या नाटकात त्यांनी जॉन मेयर ही पंतप्रधानाची भूमिका साकारली होती.’ऑल माय सन्स’, ‘द कोस्ट ऑफ युटोपिया’, ‘कोरम बॉय’, ‘द क्युरीयस इन्सिडंट ऑफ द डॉग इन द नाईट टाईम’ ही त्यांची काही नाटके. २००९ साली त्यांना ‘द नॉर्मन कॉन्क्वेस्ट’ यातील त्यांच्या कामासाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकनही त्यांना मिळालं होतं.

अशी माहिती मिळत आहे की पॉल यांनी आपली पत्नी पॉली, मुले फ्रँक आणि नोआ हे जवळ असताना शांतपणे प्राण सोडले. त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांनी ब्रिटीश नाटकांसोबतच अनेक चित्रपटही गाजवले. अशा बहुगुणी अभिनेत्याच्या जाण्याने जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.