21 September 2020

News Flash

ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा

राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाकडून रद्द

संग्रहित छायाचित्र

६५ वर्षे वा त्याहून अधिक वयाच्या कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणासाठी मज्जाव करणारा निर्णय भेदभाव करणारा, सन्मानाने उदरनिर्वाह करण्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

या प्रकरणी दाखल याचिकांवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. त्याचवेळी मालिका-सिनेमांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या वयोगटासाठी असलेल्या टाळेबंदीच्या नियमांचे पालन करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

टाळेबंदीचे नियम एकीकडे शिथिल करताना दुसरीकडे ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरणात सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र मालिका-चित्रपटांमधील छोटय़ा-मोठय़ा भूमिकांवरच आपला उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा दावा करत प्रमोद पांडे आणि ‘द इंडियन मोशन पिक्चर प्रोडय़ुसर्स असोसिएशन’ने (इम्प्पा) शासनाच्या या नियमाबाबतच्या ३० मे आणि २३ जूनच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

ज्येष्ठ नागरिकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सुनावणीच्या वेळी सरकारने केला.

परंतु ही अट केवळ कलाकारांसाठीच असून अन्य क्षेत्रांत काम करणाऱ्या या वयोगटातील लोकांना नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. या नियमामुळे कलाकारांच्या जगण्याच्या आणि व्यवसाय करण्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद या प्रकरणी न्यायालयाच्या सहकार्यासाठी ‘अमायकस क्युरी’ म्हणून नियुक्त करण्यात आलेले वकील शरण जगतियानी यांनी केला.

न्यायालय म्हणते..

* सरकारचा हा निर्णय कोणताही सारासार विचार न करता घेण्यात आलेला आहे.

* आरोग्याच्या कारणास्तव धोरण म्हणून चित्रपटसृष्टीने असा निर्णय घेणे समजून घेता येऊ शकते.

* परंतु एकीकडे ज्येष्ठ कलाकारांना काम करण्यास मज्जाव करायचा आणि दुसरीकडे याच वयोगटातील विविध क्षेत्रांतील लोकांना काम करण्यास परवानगी देणे असयुक्तिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:31 am

Web Title: pave the way for senior actors to participate in filming abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ईडीकडून रियाची तब्बल आठ तास चौकशी
2 सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलिसाच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती?
3 संपत्तीची कागदपत्रे ईडीला दाखवण्यास रियाने केली टाळाटाळ
Just Now!
X