विशाखापट्टणमजवळील एका रासायनिक कंपनीमधून गुरुवारी वायुगळती होऊन १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यु झाला. तर या कंपनीतून वेगाने वायू पसरल्यामुळे पाच किलोमीटरच्या परिसरातील जवळपास एक हजार जणांना श्वसन आणि अन्य विकाराची बाधा झाली. या प्रकरणी दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणने ट्विट करुन सध्यस्थितीमध्ये गरजुंची मदत करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याने राजकीय पक्षांनादेखील मदतीचं आवाहन केलं आहे.

करोना विषाणूचं संकट असतानाच आता वायुगळतीमुळे नवीन संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे वायुगळतीमुळे जे या संकटात सापडले आहेत. त्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सध्या गरजुंना मदत करण्याची वेळ आहे, असं ट्विट पवन कल्याणने केलं आहे.


‘सगळ्या जनसेना कार्यकर्त्यांना आणि जेएसपीच्या (जनसेना पार्टी) नेत्यांना विनंती करतो, सध्याची वेळ आंदोलन करण्याची नाही. ही वेळ गरजुंना मदत करण्याची आहे. त्यामुळे मदतकार्यावर लक्ष केंद्रित करा. तसंच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून येणाऱ्या अंतिम निर्णयाची वाट पाहुयात’, असं पवन कल्याण म्हणाला आहे.

दरम्यान, पवन कल्याण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार असून तो अनेकदा समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे भाष्य करत असतो. अलिकडेच त्याने करोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत केली होती.