पंकज भोसले

‘पीनट बटर फाल्कन’ला तांत्रिकदृष्टय़ा रोड मूव्ही म्हणता येणार नाही. कारण यातला बहुतांश प्रवास हा पाण्यातून झालेला आहे. पण परिणामाच्या दृष्टीने विचार केला, तर इथल्या भणंग भटकबहाद्दर व्यक्तिरेखा मार्क ट्वेनच्या ‘द अ‍ॅडव्हेंचर ऑफ हकलबरी फिन’ या जगप्रिय कथेची आधुनिक आवृत्ती सादर करतात. शाया लबफ आणि डकोटा जॉन्सन या मुख्य धारेतल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या इंडिपेण्डण्ट सिनेमातील झॅक गॉटसेगन या गतिमंद मुलाच्या भूमिकेने गेल्या काही महिन्यांपासून सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी ऑस्करचे नामांकन मिळविलेल्या क्वेव्हेंजिने वॉलिस या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीने जशी २०१२ सालातील सिनेप्रेमींवर भुरळ पाडली होती, तितक्याच पातळीवर लोकप्रिय बनलेल्या झॅक गॉटसेगन या कलाकाराच्या सध्या अमेरिकी माध्यमवर्तुळात जोरदार फेऱ्या सुरू आहेत. जन्मापासून असलेल्या वैगुण्याला स्वीकारत सर्वसामान्य शाळेत शिक्षण आणि अभिनयाची पदवी प्राप्त केलेल्या या कलाकाराला टायलर निल्सन आणि मायकेल श्वार्ट्झ हे दिग्दर्शकद्वयी काही वर्षांपूर्वी भेटले. अभिनयातील त्याचा उत्साह आणि प्रामाणिकपणा पाहून या ‘विशेष’ कलाकाराला मुख्य भूमिकेमध्ये ठेवत चित्रपट तयार करण्याचा त्यांनी निर्धार केला. साऱ्याच वेडय़ा दिसणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत चांगल्या ठरत नसतात. निधी मिळविण्यापासून ते साजेसे कथानक पडद्यावर साकारण्यात सहा वर्षांचा काळ गेला आणि ‘पीनट बटर फाल्कन’सारखा शहाणा प्रवासपट तयार झाला.

‘द अ‍ॅडव्हेंचर ऑफ हकलबरी फिन’च्या आरंभीच्या पानांमध्ये निवेदक हकलबरी सांगतो की (टॉम सॉयरच्या पुस्तकाच्या शेवटाला) टॉम आणि मला चोरांचा खजिना सापडला. त्याचे प्रत्येकाला मिळालेले सहा हजार डॉलर व्याजी लागल्याने रोज एक डॉलर इतकी रक्कम मिळू लागली. मला डग्लसबाईंनी दत्तक घेतले. पण त्या घरातील भयंकर सभ्य राहणी आणि रीती मला सोसेनाशी झाली अन् एक दिवस मी ‘छूंबाल्या’ केला. माझी जुनी चिरगुटं अंगावर चढवली अन् पाकाच्या पिंपात तोंड घातले. तेव्हा मला मोकळे आणि बरे वाटले. पण टॉम माग काढत आला आणि त्याच्या डाकू लोकांच्या टोळीचा सदस्य बनविण्यासाठी परत घेऊन गेला. पुढे मग टॉमची टोळी आणि टोळीतून त्याचा तराफ्यातला प्रवास, रास्कलांच्या राजासह डाकूंच्या डय़ुकसोबत भेट यांतून हकलबरी फिनची भटकबहाद्दरी संपूर्ण कादंबरीभर फुलली आहे. (भा.रा.भागवतांनी हकलबरी फिनचा केलेला मराठी अवतार ‘भटकबहाद्दर’ वाचला असेल, त्यांना हे कथानक ‘छूंबाल्या’ शब्दासह आणखी भावस्पर्शी वगैरे वाटू शकते.)

या कथानकाला आजच्या जगात आणणाऱ्या  ‘पीनट बटर फाल्कन’मध्ये एक सोडून चक्क दोन हकलबरी आहेत. पहिला आहे झॅक (झॅक गॉटसेगन) हा गतिमंद तरुण. आई-वडील आणि देखभाल करणारे कुणीच नसल्यामुळे त्याची रवानगी दोन- अडीच वर्षे एका वृद्धाश्रमामध्ये केलेली असते. या वृद्धाश्रमामध्ये आपल्यापेक्षा वयाने-विचारांने मोठय़ा लोकांसोबत राहावे लागत असल्याची तक्रार झॅक तेथे देखभालीचे काम करणाऱ्या एलेनॉरकडे (डकोटा जॉन्सन) नेहमीच करीत असतो. त्याशिवाय तिथल्या शिस्तबद्ध रीतीरिवाज आणि सभ्यपणाच्या जगण्याला कंटाळून ‘छूंबाल्या’ करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केलेला असतो. चित्रपट सुरू होतो, तो वृद्धाश्रमातून झॅकच्या यशस्वी पलायनापासून.  ‘सॉल्ट वॉटर रेडनेक’ या डब्ल्यूडब्ल्यूईमधील योद्धय़ाच्या लढाईची झॅक व्हिडीओवर पारायणे करीत असतो. ‘रेस्टलर’ बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झॅकला या योद्धय़ाला प्रत्यक्षात भेटायचे असते. झॅक वृद्धाश्रमातून पोबारा करून जवळच असलेल्या कोळ्यांच्या वस्तीत दाखल होतो. तेथे त्याची भेट टायलर (शाया लबफ) या दुसऱ्या हकलबरीशी होते.

परवाना नसताना एका टापूत मासेमारी करून बाजारात त्यांची अवैध विक्री करणाऱ्या टायलरचा रोजगाराचा मार्ग बंद झालेला असतो. त्यातच बाजारामध्ये माल पुरविणाऱ्या (म्हणजेच रास्कलांचा राजा ) डंकनशी (जॉन हॉक्स) त्याचे वैर होते. रागाच्या भरात डंकनची मासेमारीची सारी आयुधे जाळून टाकत टायलरही छानपैकी बोटीतून पलायन करतो. त्या बोटीमध्येच लपलेला झॅक आणि टायलर एकमेकांसमोर पहिल्यांदाच येतात.  टायलर झॅकशी मैत्री करतो. त्याला रेस्टलिंग शिकण्यासाठी सॉल्ट वॉटर रेडनेक याच्यापर्यंत पोहोचविण्यास तयार होतो. समुद्र, नदीपात्रातून तराफ्यातून, जंगल-शेतांतून त्यांचा प्रवास सुरू होतो.  सुपर मार्केटमधून केवळ ‘पीनट बटर’ विकत घेण्याची आपली आर्थिक ऐपत असल्याचे लक्षात आल्यावर ते पोट भरण्यासाठी न्याहरीपासून जेवणापर्यंत फक्त पिनट बटर चापत राहतात. त्यातूनच झॅक या भावी रेस्लरचे ‘पीनट बटर फाल्कन’ हे नामकरण सुचते. ते वाटेत भल्या-बुऱ्या  लोकांना भेटतात. झॅक बंदूक  चालविण्याचे शिकत स्वसंरक्षणाचा पाठ टायलरकडून घेतो. झॅकच्या मागावर एलेनॉर आणि टायलरला धडा शिकविण्यासाठी त्याच्या शोधार्थ डंकन यांची स्वतंत्र मोहीम सुरू झालेली असते. पैकी पहिले एलेनॉर यशस्वीरीत्या झॅक आणि टायलरचा शोध घेते. ‘सॉल्ट वॉटर रेडनेक’ला भेटून परत वृद्धाश्रमात परत येण्याच्या बोलीवर त्यांच्या प्रवासात सामील होते. त्यानंतर डंकन हा टायलरचा सूड घेण्यासाठी टायलरजवळ पोहोचतो. त्यानंतर गोष्टी सामान्य राहत नाहीत.

परिचित आणि काळाला पुरून उरलेल्या कथेचा पुनरावृत्त आराखडा ‘पीनट बटर फाल्कन’मधून अत्यंत सुंदर हाताळला आहे.  झॅक गॉटसेगनमध्ये जन्मत:च असलेल्या वैगुण्याचा लाभ घेत सामूहिक सहानुभूती मिळविण्याचा प्रकार इथे चित्रकर्त्यांनी जराही केलेला नाही. अभिनय, घटना प्रसंग, संवाद आणि संगीत या साऱ्या आघाडींवर या चित्रपटाची गोष्ट आवडण्यासाठी भरपूर जागा तयार करते. त्यामुळेच मुख्य प्रवाहातील नसूनही या वर्षांतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये ‘पीनट बटर फाल्कन’चा समावेश करता येईल.