सोनी वाहिनीवरील ‘पहरेदार पिया की’ या मालिकेचा वाद दिवसेंदिवस वाढतच चाललाय असं दिसतंय. सोशल मीडियापासून सुरु झालेला हा वाद आता सर्वत्रच गाजतोय. मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल झाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ‘ब्रॉडकास्टींग कन्टेन्ट कम्प्लेन्ट्स काउन्सिल’कडे (BCCC) तातडीने मालिकेबद्दल योग्य ते निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर मालिकेच्या निर्मात्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.

अनेकांनाच खटकणारं कथानक असणाऱ्या या मालिकेत ९ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यांचं लग्न होताना दाखवण्यात आलंय. यावरही निर्माते शशी आणि सुमित मित्तल यांनी परिषदेत स्पष्टीकरण दिलं. मालिकेचा लहान मुलांवर काय परिणाम होईल हा मुद्दा ऑनलाइन याचिकेत मांडण्यात आला होता. त्यावरही निर्मात्यांनी यावेळी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘आम्हालाही मालिकेतील रतनसारखीच नऊ वर्षांची मुलगी आहे. ज्या वातावरणात तुमची मुलं राहतात त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्त्व घडतं असं मला वाटतं. हनिमून आणि सुहागरात यांसारखे शब्द आजकाल कोणत्याही कुटुंबात सहज वापरले जातात. यावरुन वाद निर्माण करणे चुकीचे आहे. मालिकेत मुलाची वागणूक सामान्य मुलांसारखीच दाखवली जातेय. मालिकेत मुलगी सुहागरातविरोधात जाते आणि तिच्या नात्याचा अनादर केल्याचा ठपका कुटुंबियांवर ठेवते.’

PHOTOS : बाबांसोबत अशी रमली सनीची चिमुकली निशा

मालिकेच्या बंदीसाठी एक लाखाहूनही अधिक लोकांनी ऑनलाइन याचिकेला पाठिंबा दर्शविला आहे. यावर पुढे निर्माते म्हणाले की, ‘याचिकेला पाठिंबा देणाऱ्या कित्येक लोकांना या मालिकेबद्दल काहीच माहित नाही. टीव्ही बघत नसल्याचंही ते अभिमानाने सांगतात. जर तुम्ही मालिका पाहिलीच नाही, तर तुम्ही त्याला विरोध कसा काय करु शकता? मालिकेत काहीच आक्षेपार्ह नाही. आम्हालाही आमच्या सीमा माहित आहेत. समाजाबाहेर जाऊन कुठलीही गोष्ट आम्ही मालिकेत दाखवत नाही आहोत.’

PHOTO : प्रिती आणि ऐश्वर्याच्या मैत्रीचा असा अंदाज पाहिलात का?

या संपूर्ण वादानंतर मालिकेचं भविष्य धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. change.org या वेबसाइटवर काही दिवसांपूर्वी ‘पहरेदार पिया की’ या मालिकेविरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाठिंबा दिला असून, पाठिंबा देणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.