News Flash

‘पहरेदार पिया की’ मध्ये चुकीचे दाखवलेले नाही’

या मालिकेचा आशय आक्षेपार्ह किंवा कुठलाही चुकीचा संदेश देणारा नाही.

वादग्रस्त मालिका सुरूच ठेवण्याचा निर्मात्यांचा निर्धार

एका नऊ वर्षांच्या मुलाचा विवाह अठरा वर्षांच्या तरुणीशी लावून देत बालविवाहाच्या प्रथेला खतपाणी घालणारी ‘पहरेदार पिया की’ ही ‘सोनी टीव्ही’वरची मालिका वादात सापडली आहे. लहान मुलाच्या कल्पनेतही नसलेल्या ‘सुहाग रात’सारख्या गोष्टी दाखवून ही मालिका चुकीचा संदेश जनमानसांत पोहोचवते आहे. त्यामुळे यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका खुद्द माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. मात्र या मालिकेला विनाकारण विरोध होत असून यात कुठलाही आक्षेपार्ह आशय दाखवण्यात आलेला नाही, असा खुलासा मालिकेचे निर्माते शशी आणि सुमीत मित्तल यांनी केला आहे.

सोनी टीव्हीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पहरेदार पिया की’ ही मालिका त्याच्या वेगळ्या विषयामुळे प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत होती. या मालिकेतील छोटय़ा राजकुमाराचे आई-वडील अपघातात गेल्यानंतर त्याचे रक्षण करण्यासाठी दिया या अठरा वर्षांच्या तरुणीशी त्याचा विवाह लावून दिला जातो. नऊ वर्षांच्या मुलाचा त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या मुलीशी विवाह दाखवणाऱ्या या मालिकेत या दोघांचा मधुचंद्रही दाखवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. या मालिकेमुळे बालविवाहाच्या प्रथेलाच आपण दुजोरा देत आहोत, याची निर्माते आणि वाहिनीला कल्पना नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. आणि टीआरपीच्या खेळासाठी असा आशय जाणीवपूर्वक टीव्हीवर दाखवला जात असून त्यावर ताबडतोब बंदी आणण्याची मागणी ‘चेंज.ऑर्ग’ या संस्थेने याचिकेद्वारे केली होती. या विषयातील गांभीर्य लक्षात घेत स्मृती इराणी यांनीही ‘बीसीसीसी’ (ब्रॉडकॉस्टिंग कन्टेन्ट कम्प्लेन्ट कौन्सिल) कडे ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. पण याचिकेत नमूद के ल्याप्रमाणे यात कुठेही मधुचंद्राचे दृश्य नाही. काही लोकांकडून मालिका न पाहताच त्याविषयी विनाकारण आक्षेप घेण्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप मालिकेचे निर्माते शशी मित्तल आणि सुमीत मित्तल यांनी सोमवारी केला.

या मालिकेचा आक्षय आक्षेपार्ह किंवा कुठलाही चुकीचा संदेश देणारा नाही. त्यामुळे आम्ही आणि ‘सोनी टीव्ही’ वाहिनीही मालिको सुरूच ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहे, असेही त्यांनी सांगितले. मालिका बंद करण्याविषयीची कोणतीही सूचना अद्यापपर्यंत आपल्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून मिळालेली नाही. मालिकेबाबत कायदेशीर कारवाई झाली तर त्यालाही सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मात्र सध्या मालिकेबद्दल कितीही नकारात्मक वातावरण असले तरी मालिका बंद करण्यात येणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:23 am

Web Title: pehredaar piya ki sony tv show pehredaar piya ki producer
Next Stories
1 सेन्सॉरच्या नवनिर्वाचित अध्यक्षांनी पहिल्याच दिवशी मारली दांडी
2 ‘पहरेदार पिया की’ मालिकेच्या अडचणीत वाढ
3 फिटनेससाठी कतरिनाला गुरु मिळतात तेव्हा…
Just Now!
X