बाजीराव-मस्तानीच्या निमित्ताने चित्रपटगृहामध्ये वातावरणनिर्मिती

बाजीराव-मस्तानी या चित्रपटातील गाण्यांवरुन वादंग निर्माण झाला असतानाच अलिबागमधील बीव्हीएम मल्टिप्लेक्स सध्या सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरले आहे. या चित्रपटगृहात बाजीराव-मस्तानी प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त या वास्तुच्या रंगरूपात अनोखे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे येथे साक्षात पेशवाई अवतरल्याचा भास होत आहे. ही पेशवाई अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना अधिकचा वेळ काढूनच येथे यावे लागत आहे. दर्शनी भागात ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया बग्गीची प्रतिकृती पाहून प्रेक्षक भूतकाळात जात आहेत. या बग्गीत बाजीरावांच्या वेशभूषेतील कर्मचारी बसवण्यात आला आहे. त्यानंतर पेशव्यांची दुर्मीळ छायाचित्रे आणि तैलचित्रे, चित्रकारांनी बाजीराव आणि मस्तानी यांच्या इतिहासाचे दाखले देणाऱ्या साकारलेल्या कलाकृती, शनिवार वाडा, विश्रामबागेतील मस्तानी महाल आदी एकापेक्षा एक सुंदर गोष्टी प्रेक्षकांच्या नजरेस पडतात. येथील कर्मचारीही मराठमोळ्या पारंपरिक पेहरावात स्वागतासाठी सज्ज असल्याने या वातावरणनिर्मितीत भर पडते. यामुळे भारावलेल्या अवस्थेतील प्रेक्षक या चित्रपटाचा वेगळ्याच प्रकारे आनंद घेत आहेत.

सजावटीत बदल यापूर्वीही

चित्रपटाच्या कथानकानुसार सजावट बदलण्याची या चित्रपटगृहाची ही पहिली वेळ नाही. दर आठवडय़ाला बदलणाऱ्या मराठी अथवा िहदी चित्रपटानुसार सजावट बदलण्याची परंपरा व्यवस्थापनाने पाळली आहे. यापूर्वी काकस्पर्श, कोकणस्थ, पीके, मुंबई- पुणे मुंबई-२ यांसारख्या चित्रपटांसाठीही अशीच सजावट करण्यात आली होती. या सजावटीसाठी दर महिन्याला मोठी रक्कम खर्च केली जाते आहे. मात्र त्यामुळे प्रेक्षकांच्या खिशाला कात्री लागणार नाही, अशी काळजी आम्ही घेतो, प्रेक्षकांनाही ही आगळीवेगळी कल्पना खूप आवडली असल्याचे संचालक सत्यजित दळी यांनी सांगितले.