मुर्ती लहान पण किर्ती महान याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अभिनेता ‘पीटर डिंकलेज’ होय. फक्त ४ फुट उंची असणाऱ्या या अभिनेत्याने आज लोकप्रियतेच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्यांना मागे सोडले आहे. पीटर आता अगामी सुपरहिरोपट ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मध्ये दिसणार आहे. ३०पेक्षा जास्त सुपरहिरोंची फौज असलेल्या चित्रपटात पीटर नेमकी कोणती भुमिका साकारणार याबाबत काहीसा गोंधळ असला तरी माव्‍‌र्हलने आपल्या वेबसाईटवरुन त्याच्या सहभागाची अधिकृत घोषणा केली आहे.

आजवर ‘द स्टेशन एजंट’, ‘लिव्हींग इन ऑब्लीव्हियन’, ‘फाईंड मी गिल्टी’, ‘पीट स्मॉल इज डेड’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकलेल्या पीटरला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील ‘टिरियन लॅनिस्टर’ या व्यक्तिरेखेमुळे. आज तो सिनेसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक म्हणुन ओळखला जातो. ६ कोटी ६० लाख प्रतिशब्द या दराने त्याने ३०० कोटी ९६ लाख रुपयांची कमाई ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतुन केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत नामांकन मिळवलेल्या ‘थ्री बीलबोर्ड आउटसाइड एबिंग, मिझुरी’ या चित्रपटातही त्याने महत्वाची भुमिका बजावली होती. आणि हाच पीटर आता अ‍ॅव्हेंजर्समध्ये झळकणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अ‍ॅव्हेंजर्स हा त्याचा पहिला सुपरहिरोपट नसुन त्याआधि पीटरने ‘एक्स मेन: डेझ ऑफ फ्युचर पास्ट’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची भुमिका साकारली होती.  माव्‍‌र्हलचे सर्वच चित्रपट एकमेकांशी लिंक असतात. त्यामुळे एक्स मेनमध्ये त्याने साकारलेली ‘बॉलिव्हर ट्रास्क’ ही व्यक्तिरेखा पुन्हा नव्याने अ‍ॅव्हेंजर्समध्ये दिसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

माव्‍‌र्हलसाठी ‘ब्लॅक पँथर’, ‘होकाय’, ‘व्हिजन’, ‘स्केर्लेट विच’ यांसारख्या त्यांच्या दुसऱ्या फळीतील सुपरहिरोसांठी हा अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे. तसेच त्यांचा प्रमुख प्रतीस्पर्धी डीसीला पछाडुन सुपरहिरो सिनेसृष्टीत निर्णायक आघाडी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे. तसेच पीटर डिंकलेजचा अनुभव, उत्कृष्ट अभिनय आणि त्याची लोकप्रियता या माध्यमातुन माव्‍‌र्हलला आणखीन एक पाउल पुढे जाता येईल. आणि यामुळेच त्यांनी आपली आजवरची सर्वात मोठी गुंतवणुक ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’मध्ये केली आहे.