सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे मालिकेचं कथानक. एका १८ वर्षीय तरूणीचं ९ वर्षांच्या मुलाशी होणारं लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेलं या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे. याचाच विरोध अनेकांनी केलाय. आता या मालिकेवर बंदी आणण्यासाठी Change.org या वेबसाइटवरुन माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘Change.org’ या वेबसाइटवर मानसी जैन यांनी ही याचिका दाखल केली. त्यानंतर सुमारे १८ हजार लोकांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. ‘नऊ वर्षांचा मुलगा त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलीशी लग्न करतो, तिच्या भांगात कुंकू भरतो असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित होते. प्राइम टाइममध्ये असल्याने प्रेक्षकांच्या मनावर कशाप्रकारे ही मालिका कशाप्रकारे ठसा उमटवतेय याचा विचार करावा. या मालिकेवर बंदी आणावी अशी आमची मागणी आहे. अशा प्रकारच्या मालिकांचा आमच्या मुलांवर काही परिणाम होऊ नये अशी आमची इच्छा आहे,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.

वाचा : ‘या’ चित्रपटातून रामदेव बाबांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

नऊ वर्षीय रतन (अफान खान) आणि १८ वर्षीय दिया (तेजस्वी प्रकाश) यांचं मालिकेत लग्न झालेलं दाखवलंय. इतकंच नव्हे तर हे दोघेही आता हनिमूनला जाणार असल्याचीही माहिती काही दिवसांपूर्वी समोर येत होती. टीआरपी मिळवण्यासाठी मालिकेत असा मूर्खपणा दाखवण्यात येणार असल्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.