सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूडमधील पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे काही केल्या कमी होईना. या चित्रपटाविरोधात आंतरराष्ट्रीय हिंदू सेना या संघटनेने याचिका दाखल केली आहे. गुजरात हायकोर्टात ही याचिका दाखल केली असून पुढच्या आठवड्यात त्यावर सुनावणीची शक्यता आहे.

सारा अली खान व सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात केदारनाथ या हिंदू धर्मीयांच्या पवित्र ठिकाणी नायक- नायिकेचा किसिंग सीन दाखवण्यात आला असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली आहे.

Photos : थलैवाच्या चाहत्यांचा ‘रजनी’उत्सव

२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाचा संदर्भ या चित्रपटाला देण्यात आला आहे. चित्रपटाविरोधात याआधी रुद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर काही लोकांनी निदर्शनेही केली होती. ‘केदारनाथ’चा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून या विरोधाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही ट्विट करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली होती. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना चित्रपटावर बंदी आणण्याची विनंती त्यांनी या ट्विटद्वारे केली होती.

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटाच्या वाटेत आधीही बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आता ‘केदारनाथ’च्या प्रदर्शनाची वाट मोकळी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.