देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर नव्वदीपार गेले आहेत. त्याचबरोबर डिझेलही प्रचंड महागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचे जुने ट्विट दाखवत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांनी ट्विट करून टीका केली होती. अमिताभ यांनी युपीए सरकारच्या काळात केलेली काही ट्विट, त्याचबरोबर अक्षय कुमार व अनुपम खेर यांनी केलेल्या ट्विटवरून भाई जगताप यांनी सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे.

या अभिनेत्यांच्या ट्विटचा फोटो पोस्ट करत ‘हे देशभक्त आता ईलेक्ट्रीकल्स कार चालवतात का?’, असा प्रश्न भाई जगताप यांनी विचारला आहे.

काय आहेत ट्विटस्?

अमिताभ बच्चन यांनी केलेले तीन ट्विट भाई जगताप यांनी पोस्ट केले आहेत. यात ‘रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कलयुग आएगा, गाडी खरीदो गे cash से और petrol loan से आएगा।,” अशा स्वरूपाचे ट्विट आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमारनंही सायकल वापरण्यास सुरूवात करावी लागेल, असं म्हटलेलं ट्विट जगताप यांनी पोस्ट केलं आहे.

देशभरात पेट्रोलचे दर प्रचंड वाढले असून, मुंबईत सोमवारी (८ फेब्रुवारी) पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९३.४९ रुपये इतके आहेत. तर इतर शहरातही अशीच परिस्थिती आहे. नागपूरमध्ये प्रतिलिटर ८४.५४ रुपये, ८२.०४ रुपये, नाशिक ८३.२४ रूपये लिटर पेट्रोलचे दर आहेत.