बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक नीरज वोरा गेल्या काही महिन्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेले काही महिने नीरज यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, एक आठवड्यापूर्वीच त्यांना व्हेंटिलेटरवरून सर्वसाधारण विभागात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. नीरज यांच्या प्रकृतीत सुधार होत असला तरी ते अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाहीत. ऑक्टोबरमध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यावेळी ते दिल्लीत होते. सदर घटनेनंतर नीरज यांना लगेच एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तब्येतीमध्ये फारशी काही सुधारणा झालेली नाही. त्यांना कोणीही आवाज दिल्यावर ते केवळ डोळे उघडून पाहतात. बाकी ते कोणतीही हालचाल करू शकत नाहीत.

मन आणि बादशाह यांसारख्या चित्रपटातून नीरज यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचसोबत खिलाडी ४२० आणि फिर हेरा फेरी या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. वोरा यांनी सुपरहिट चित्रपट रंगीला, अकेले हम अकेले तुम, चोरी चोरी चुपके चुपके आणि हेरा फेरी यांसारख्या चित्रपटांचा स्क्रिनप्ले देखील लिहीला आहे. स्पॉटबॉय ई या संकेतस्थळाने हे वृत्त दिले असून त्यांनी म्हटलेय की, नीरज यांच्या पत्नीचे २००४ सालीच निधन झाले आहे. तसेच त्यांना मुलही नाही.

दिल्लीमध्ये नीरज वोरा यांच्या जवळची अशी कोणतीच व्यक्ती नाही. त्यामुळे मुंबईतील त्यांची मित्रमंडळीच दिल्लीला वरचेवर जाऊन भेट घेत असतात. बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि परेश रावल हे त्यांचे खास मित्र आहेत. या दोघांनीही काही वेळा दिल्लीला जाऊन नीरजच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच निर्माता फिरोज नाडियदवालाही नीरज वोरा यांच्या तब्येतीची काळजी घेत आहेत.